
एकाच ठिकाणी बराच वेळ बसल्याने पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. कारण खूप वेळ बसल्याने कंबरेवर ताण येतो. मणक्याला आधार देणारे स्नायू आणि रक्तवाहिन्या यांवरही भार येतो. अशावेळी पाठीचा त्रास होऊ नये यासाठी काय कराल?
- सध्या अनेक जणांना कॉम्प्युटरवर काम करावे लागते. त्यामुळे शारिरीक हालचाल कमी होते. हाडं आणि स्नायू कमजोर होतात. यासाठी बैठे काम करणाऱ्या लोकांनी मणक्याची काळजी घ्यावी. याकरिता नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. पाठीच्या कण्याचे आरोग्य टिकवण्यासाठी हा सोपा उपाय आहे.
- बसताना शरीराची स्थिती कशी आहे, यावरही पाठदुखी अवलंबून असते. नेहमी ताठ बसावे. वाकून बसू नका.
- दोन तासांपेक्षा जास्त वेळ एका ठिकाणी काम करण्यासाठी बसू नये. अधूनमधून खुर्चीतून उठावे. फेरफटका मारावा. यामुळे शरीर, मेंदू, डोळ्यांना विश्रांती मिळते.
- अशावेळी पाय दुखण्याचीही शक्यता असते. म्हणून गुडघे आणि पायांची हालचाल करावी.
- जास्त वजन उचलण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे पाठीवर भार येऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे वजन उचलताना काळजी घ्या.
- पवनमुक्तासन, कटीचक्रासन, भुजंगासन अशी पाठीच्या स्नायूंना उपयुक्त योगासने केल्यानेही पाठदुखी दूर होऊ शकते. यामुळे ताण मिळून पाठीचे स्नायू बळकट होतील.


























































