नगरमध्ये टायरचे शोरूम फोडून तीन लाखांची चोरीम एकाच शोरूममध्ये तिसऱ्य़ांदा चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यातील कोल्हार भागवतीपूरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून थंडावलेले चोरीसत्र पुन्हा सुरू झाले आहे. मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी येथील सुरेश रामनाथ निबे यांचे एमआरएफ टायर शोरूमचे शटर तोडून सुमारे 3 लाखांपेक्षा अधिक मुद्देमाल चोरल्याची घटना घडली. या दुकानात सलग तिसऱ्य़ांदा चोरीची घटना घडली असून, मागील दोन्ही घटनांचा तपास अद्यापि लागलेला नाही.

मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी सदर शोरूमच्या शटरखालील फरशी काढली. त्यानंतर कुलूप तोडण्याऐवजी शटर थेट कटावणीच्या साहाय्याने उभे तोडले. चोरीपूर्वी येथील सीसीटीव्हीचे कनेक्शन आधी तोडून आपण कॅमेऱ्य़ात दिसणार नाही, याची काळजी चोरट्यांनी घेतली. दुकानातील महागडे टायर टेम्पोत टाकून चोरटे पसार झाले.

या घटनेची माहिती लोणी पोलिसांना अवघ्या काही वेळातच समजल्याने कोल्हार पोलीस औटपोस्टला नियुक्त असलेले सहायक फौजदार बाबासाहेब लबडे व हेडकॉन्स्टेबल राजेंद्र औटी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. मध्यरात्री दुकानाचे चालक सुरेश आर. निबे यांना घरून पोलिसांनी दुकानात आणल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे समजले. घटनेनंतर लोणीचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील हे तातडीने दाखल झाले. त्यानंतर नगरहून ठसे तज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. लोणी पोलिसांनी वेगवेगळे पथक तयार करून तपास सुरू केला आहे. पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब सूर्यवंशी तपास करीत आहेत.