सुबक ग्लॅमरस नाटक – तिसरे बादशाह हम!

756

>> क्षितिज झारापकर

तिसरे बादशाह हम!’ सुनील बर्वेचं अजून एक सुबकनाटक. सुनीलला दर्जा आणि ग्लॅमर या दोन्हीचा उत्तम मेळ जमतो.

मराठी नाटय़सृष्टी हा एक धंदा आहे. हे वाक्य जरा त्रासदायक वाटतं ऐकायला. आजवर रंगकर्मींनी निःष्पक्ष भावाने आणि मायबाप प्रेक्षकांच्या आशीर्वादाने व राजाश्रयाच्या मदतीने कलेची सेवा करायची असते वगैरे विचार खूपदा कानावर

येतात, पण थोडा विचार केला की, यात काही तथ्य नाही हे उघड होतं. गॅसबत्त्यांच्या उजेडात चावडी–चव्हाटय़ावर होणारे नाटय़प्रयोग केव्हाच थांबले. आज महाराष्ट्राच्या तप्त वातावरणात वातानुकूलित प्रेक्षागारं उपलब्ध आहेत. ज्यांच्या रंगमंचावर अत्याधुनिक ध्वनी आणि प्रकाशयोजनेची साधनं तैनात आहेत. दोनवेळचं जेवण आणि भत्ता यावर काम करणारे कर्मचारी जाऊन आता व्यावसायिक कलाकार आणि तंत्रज्ञ नाटय़सेवेत रुजू झालेत. नाटक कंपनीचं बिऱहाड गावात आलं की, आपोआप होणाऱया पब्लिसिटीने आता वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाणीवर जाहिरात करणं सुरू केलं. या सगळ्या प्रगतीला एक मूलभूत खर्चाचं गणित आहे. ते गणित सोडवणं हे नाटय़ निर्मात्याला क्रमप्राप्त आहे. आणि म्हणूनच नाटय़निर्मिती हा एक धंदा आहे, पण धंदा म्हटलं की, वाईटच हा समज आणि त्यात नाटक धंदा म्हटलं की, मग कलेचं काय, हा प्रश्न ओघाने येतोच. नाटय़ निर्मात्यांनी त्या-त्या काळाची आर्थिक गणितं सांभाळत उच्च आणि दर्जेदार नाटकांची उधळण मराठी रंगभूमीवर चालू ठेवली म्हणून छत्रपतींचे बंधू व्यंकोजीराजे भोसले यांना तंजावरमध्ये सुरू केलेली मराठी नाटकांची कलोपासना ही आण्णासाहेब किर्लोस्करांच्या माध्यमातून सांगलीमार्गे मराठीमनात रुजली आणि धडधाकटपणे आजही सुरू आहे. या बाबतीतलं अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं तर सुनील बर्वे या  चिरतरुण नटाने काही वर्षांपूर्वी सुबक ही नाटक कंपनी सुरू केली. त्यात हर्बेरियम नावाच्या उपक्रमांतर्गत काही नाटकं  जबरदस्त डमडौलात, पण मोजक्याच प्रयोगांच्या गणितानिशी सादर केली आणि शिलकीचा अर्थसंकल्प घडवला. आता पुन्हा सुनील बर्वे यांनी एक नाटक उभं केलंय. ‘तिसरे बादशाह हम’हे या नाटकाचं नाव.

यावेळी सुनीलने ‘झी’ मराठीला बरोबर घेऊन नाटकाची आर्थिक सांगड घातली आहे. ‘झी’ला गौरवास्पद असणाऱया नावांच्या मांदियाळीत सुनील बर्वे हे नाव आग्रगण्य आहे त्यामुळे हा मेळ तसा अपेक्षितच आहे. यामुळे ‘तिसरे बादशाह हम’ हे नाटक ग्लॅमरस असणार हे निश्चित आणि ते तसंच आपल्या समोर येतं. लेखक क्षितिज कुलकर्णी याने ‘तिसरे बादशाह हम’ हे आजच्या सामाजिक चौकटीत बसणारं नाटक लिहिलं. वीसेक वर्षांपूर्वी जॉन रिटर नावाच्या अभिनेत्याची ‘थ्री इज कंपनी’ नावाची एक मालिका अमेरिकेत तुफान लोकप्रिय होती. दोन बायकांच्या सोबत पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱया एका माणसावरची प्रासंगिक विनोदी मालिका होती ती. तोच बाज घेऊन ‘तिसरे बादशाह हम’ सुरू होतं, पण लगेचच क्षितिज आपल्याला धक्का द्यायला सुरुवात करतो आणि सिटकॉमच्या दिशेने न जाता तो चक्क एक तरल, पण रहस्यमय नाटक उभं करतो. ‘तिसरे बादशाह हम’मध्ये प्रत्येक पात्राची एक भिन्न गोष्ट आहे. ही भिन्नता या नाटकाचा प्लस पॉइंट आहे ज्यामुळे सतत नाटकात वेगळंच घडत जातं जे प्रेक्षक म्हणून आपण अपेक्षित करत नाही. म्हणूनच आपण नाटकात अधिक गुंतत जातो. ही हुशारी दिग्दर्शक परितोष प्रधान याची आहे. परितोषने ‘तिसरे बादशाह हम’ कुठेही संथ होऊ दिलेलं नाही. नाटकात लाईव्ह गाणी आहेत तरीही नाटकाचा वेग मंदावत नाही हे विशेष.

‘तिसरे बादशाह हम’ हे तीन पात्रांचं नाटक आहे. सुनील बर्वे स्वतः यात एक भूमिका करतो आणि नाटकाला स्टार पॉवर प्रदान करतो. एक तर सुनील एक उत्तम नट आहे. त्यात तो मुळात रंगभूमीशी नेहमी प्रामाणिक राहिलाय. त्याला त्याचं असं निश्चित ग्लॅमर आहे आणि ते तो इथे व्यवस्थित वापरतो. पण त्याचच नाटक आणि तोच प्रमुख नट असं असताना तो कुठेही दोन नवीन मुलींना अव्हरशॅडो करत नाही हे त्याच्यातल्या गुणी कलाकाराचं लक्षण आहे. नाटकातली सगळी गाणी सुनील स्टेजवरून अत्यंत सहजपणे लाईव्ह गातो. आशुतोष वाघमारेचं संगीत, वैभव जोशीचे शब्द आणि सोनिया परचुरेचं नृत्य दिग्दर्शन ‘तिसरे बादशाह हम’ हे खूपचं रंजक करून टाकतं. अभिज्ञा भावे ही एक तडफदार अभिनेत्री म्हणून दूरचित्रवाणीच्या माध्यमातून आपल्याला माहीत आहे. रंगमंचावरचं तिचं बहुदा हे पहिलं व्यावसायिक नाटक असेल. अभिज्ञाने ‘तिसरे बादशाह हम’मध्ये केवळ आपल्या मुद्रभिनयातून कमाल केली आहे. ऑक्टिंगपेक्षा नाटकाच्या माध्यमात रिऍक्शन जास्त महत्त्वाची असते. अभिज्ञा या नाटकात आपल्याला पदोपदी हे पटवून देते. ‘तिसरे बादशाह हम’मध्ये तिसरी कलाकार आहे मयुरी देशमुख. मयुरी ही एक खूप चांगली रंगकर्मी आहे. ती अभिनेत्री तर उत्तम आहेच, पण ती एक नाटककारदेखील आहे. इथे तिने एका शहरात राहणाऱया, पण ग्रामीण टच असलेल्या मुलीची भूमिकाही तितक्याचं सहजतेने पेलली आहे. एकच कलाकारांच्या कामगिरीत ‘तिसरे बादशाह हम’ मस्त जमलंय. संदेश बेंद्रे यांनी मुंबईतल्या टॉवरमधल्या फ्लॅटचं नेपथ्य सुरेख उभारलंय. उल्लेश खंदारे यांची रंगभूषा नाटकाला पूरक आहे.

धंद्याच्या गणितात सर्वच बाबतीत फिट बसेल असं नाटक आहे. ‘तिसरे बादशाह हम’. गणितात एक एक्स–फॅक्टर असतो. प्रेक्षक पसंती हे नाटक धंद्यातला एक्स–फॅक्टर. ‘तिसरे बादशाह हम’ला हा फॅक्टर भरघोस मिळूदे ही प्रार्थना.

नाटक – तिसरे बादशाह हम! निर्मिती – सुबक, झी मराठी  लेखक – क्षितिज कुलकर्णी  नेपथ्य – संदेश बेंद्रे  प्रकाश – रवी रसिक  संगीत – आशुतोष वाघमारे  गीत – वैभव जोशी  नृत्य – सोनिया परचुरे  रंगभूषा – उलेश खंदारे  दिग्दर्शक – परितोष प्रधान  कलाकार – मयुरी देशमुख, अभिज्ञा भावे, सुनील बर्वे.

आपली प्रतिक्रिया द्या