टिटवाळ्यात ‘डॉग टेररिस्ट’; एका दिवसात 20 जणांना चावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण-डोंबिवलीत भटक्या कुत्र्याची दहशत वाढली असून आज तर एका दिवसात टिटकाळ्यात 20 जणांचे पिसाळलेल्या कुत्र्याने लचके तोडले. ‘डॉग टेररिस्ट’च्या दहशतीमुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात पालिका प्रशासन गंभीर नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.

मांडा, टिटवाळा, बल्याणी, उभंर्णी, कासुन्द्रा रोड, गणेश मंदिर रोड आदी टिटवाळ्यातील परिसरात मोठ्या प्रमाणावर मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीती आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने पंचवटी चौक परिसरातील मयूर चव्हाण, विनायक वाघमारे, श्रावणी भोईर, पियुष कोळी, विशाल गुप्ता, अमन वाघ, खुशबू गुप्ता या शाळकरी मुलांचा चावा घेतला. मुलांच्या हातावर, पायावर, चेहऱ्यावर जखमा झाल्या असून पालिकेच्या तसेच काही खासगी दवाखान्यात या मुलांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय चार महिला, तीन पुरुष आणि दोन वृद्धा यांचेही भटक्या कुत्र्यांनी लचके तोडले. भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे मुलांना शाळेत पाठवण्यासही पालक धजावत नाहीत. घराबाहेर पडताना नागरिक हातात काठ्या घेत आहेत. नागरिकांचा संताप वाढल्यानंतर आज पालिकेने टिटवाळ्यातील 20 भटकी कुत्री डॉग व्हॅनद्वारे पकडली.

निर्बिजीकरणातून संस्था मालामाल
पालिका प्रशासन भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी लाखो रुपये खर्च करते. मात्र तरीही भटक्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात येत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. जानेवारी 2015 ते नोव्हेंबर 2019 पर्यंत 40,274 भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले असून एका भटक्या कुत्र्याच्या निर्बिजीकरणासाठी 840 इतका खर्च वेटस् फॉर अॅनिमल वेलफेअर ऍण्ड सॅर्लड डेव्हलपमेंट या संस्थेला पालिका देते. मात्र संस्था नेमके काय काम करते हा संशोधनाचा विषय आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे.