सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना अशोक खरात प्रकरण दाबावं लागलं तर माहित नाही, संजय राऊत यांचे सूचक विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना काळात थाळ्या वाजवल्या आता रिकामे सिलिंडर वाजवाचे का? असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला. तसेच सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना खरात प्रकरण दाबावं लागलं तर माहित नाही असे सूचक विधानही संजय राऊत यांनी केले.

दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, अशोक खरात प्रकरणी फार विचार करू नका. त्यासाठी महाराष्ट्राचे पोलीस समर्थ आहे. आता पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करत आहेत. या गुन्ह्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे अनेक मंत्री आणि आमदार सहभागी होते, म्हणून मी म्हणतोय त्यांना सहआरोपी करा. अशी माहिती आहे की हे जे ऑपरेशन केलं त्यात नाशिकच्या बाहेरचे सुद्धा एक पोलीस पथक सहभागी होतं आणि ती अत्यंत गुप्ततेने कारवाई झाली. हे फक्त मुख्यमंत्री नाशिकचे पोलीस आयुक्त मॉनिटरिंग करत होते बाकी कोणी नाही. यापुढे भविष्यामध्ये अशा भोंदूगिरीला राज्याच्या सरकार मधून आणि प्रशासनातून पाठबळ मिळू नये म्हणून यात सहभागी असलेले आमदार, राजकीय कार्यकर्ते, खासदार, मंत्री अधिकारी यांची तपासाअंती माहिती समोर आली पाहिजे हीच आमची भूमिका आहे असे संजय राऊत म्हणाले.

मी पहिल्या दिवशीच मुख्यमंत्र्यांचं आणि नाशिक पोलिसांचे अभिनंदन केलेलं आहे. खरात प्रकरण हे फक्त हिमनगावरचे टोक आहे, बाकी अजून बऱ्याच गोष्टी बाहेर यायच्या आहेत. खरात प्रकरण दाबलं जाईल असं मला वाटत नाही. फक्त सरकार वाचवण्यासाठी जर मुख्यमंत्र्यांना काही गोष्टींची तडजोड करावी लागली तर मला माहित नाही. महायुतीमध्ये सध्या जे ‘एकात्मतेच’ दर्शन घडतंय त्यासाठी त्यांना काही सोंग ढोंग करावे लागले तर मला माहित नाही असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

युद्ध सुरू होऊन 25 दिवस झाले आहेत आणि 25 दिवसांनंतर आपल्या पंतप्रधानांना साक्षात्कार झाला आहे की सभागृहात जाऊन सगळ्यांसोबत आपल्या विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे. सर्वांना सोबत घेतलं पाहिजे. आम्ही इतक्या दिवसांपासून सांगत आहोत की सर्वपक्षीय बैठक घ्या. तुम्ही सगळ्यांना बोलवा, जो संकट समोर आलं आहे, जगात आलं आहे ते हिंदुस्थानातही येऊ शकतं, त्याबाबत तुम्ही सर्वांशी चर्चा करा, सगळ्यांची मते घ्या. पण जेव्हा पंतप्रधानांना वाटलं की हे त्यांच्या नियंत्रणाबाहेर जात आहे, तेव्हा ते सभागृहात आले. आणि सगळ्यांशी बोलतील. देशाची परिस्थिती कोरोनासारखी निर्माण झाली आहे. कोरोना काळात थाळ्या-टाळ्या वाजवल्या होत्या, आता काय रिकामे सिलेंडर वाजवायचे आहेत का? असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

राहुल गांधींचा मुद्दा बरोबर आहे. पंतप्रधान जर चर्चा करतील, तर आपल्या मनात देशाबद्दल जे प्रश्न आहेत, जी गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे, त्या संदर्भातले प्रश्न आहेत, त्याची उत्तरे आपल्याला मिळाली पाहिजेत. जर तुम्ही शांततेसोबत उभे आहात, तर शांतता कुठे आहे? कुठे राहते? तुमच्या बंगल्यात आहे का? PMO कार्यालयात आहे का? देशात शांतताच नाही आहे. तुम्ही शांतता आणि विकास कुठे लपवून ठेवले आहेत, ते आम्हाला सांगा. जर तुम्ही शांततेच्या बाजूने आहात, तर हिंदुस्थानसोबत तुम्ही एकटेच आहात का? 140 कोटी जनता हिंदुस्थानसोबत आहे, तुम्ही एकटे नाही आहात. तुम्ही हिंदुस्थानचे मालक नाही आहात. जर शांतता काय असते हे जाणून घ्यायचं असेल, तर महात्मा गांधी, पंडित नेहरू यांचे चरित्र वाचले पाहिजे. पंचशीलचे तत्व वाचा, अशा भाषणांनी काय होणार? असेही संजय राऊत म्हणाले.