ठाण्यात उघड्या चेंबरमध्ये चिमुकला कोसळला, राबोडीतील धक्कादायक घटना

ठाणे शहरातील राबोडी परिसरात 20 फूट उघड्या चेंबरमध्ये चिमुकला कोसळल्याची घटना घडली आहे. हा प्रकार लक्षात येताच आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत या चिमुकल्याला बाहेर काढले. हमदान कुरेशी (2) असे या मुलाचे नाव असून सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. मात्र त्याला 48 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

राबोडी येथील हमदान हा मंगळवारी दुपारी आई आणि मोठ्या भावासह मेंटल हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या नातेवाईकांकडे आला होता. घरी परतण्यासाठी त्यांचे वडील रिक्षा आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी धर्मवीरनगर येथून जात असता हमदानचा तोल गेला आणि तो स्ट्रॉम वॉटर पाइपलाइनच्या उघड्या गटार चेंबरमध्ये पडला. ही बाब लक्षात येताच स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. यातील एका तरुणाने चेंबरमध्ये उतरून हमदानला बाहेर काढले. चिमुकल्याला तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथून त्याला ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याला 48 तासांसाठी डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली.

अखेर चेंबर बंद

घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, नौपाडा कोपरी प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, स्थानिक लोकप्रतिनिधी, उपनगर अभियंता, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तसेच बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यांनी घटनास्थळी धाव घेतली. उघड्या चेंबरचे झाकण लोखंडी पाइपमुळे बंद होत नव्हते. त्यामुळे लोखंडी पाइप ग्रँडर व गॅस कटरच्या सहाय्याने कापून बाजूला करण्यात आला आणि चेंबर बंद केला गेला.