पश्चिम द्रुतगती महामार्गावर सुसज्ज शौचालय; मधुमेह, रक्तदाब रुग्णांना दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम द्रुतगती महामार्गावर अदानी इलेक्ट्रिसिटी ऑफिसजवळ वातानुकूलित आधुनिक व सुसज्ज असे निर्मल शौचालय उभारून शिवसेनेने मधुमेह, रक्तदाब रुग्ण आणि प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. कांदिवलीपासून वांद्रय़ाच्या दिशेने जाताना साऊथ बॉण्ड दिशेला मालाड पूर्वेला शौचालय असावे म्हणून शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार आणि विभागप्रमुख सुनील प्रभू प्रयत्नशील होते.

पश्चिम द्रुतगती महामार्गावरून दररोज सुमारे 5 लाख वाहने मुंबईकडे आणि मालाड -दहिसरकडे जातात. कांदिवली येथून वांद्रय़ाकडे जाताना कांदिवली पूर्वनंतर थेट अंधेरी पूर्व येथे शौचालय आहे. या दरम्यान या महामार्गावर महिला व पुरुषांसाठी सुसज्ज शौचालयच नव्हते यामुळे प्रवाशांची कुचंबणा होते. त्यातच सध्या अंधेरी ते दहिसर मेट्रोचे काम येथे सुरू असल्यामुळे येथे मोठी वाहतूक काsंडी होत आहे. त्यामुळे प्रवाशांना तासन्तास गाडीत बसून राहावे लागत असल्याने शौचालयाअभावी नागरिकांचे आणि विशेषकरून मधुमेह आणि रक्तदाब असलेल्या व्यक्तींचे खूप हाल होत होते. शौचालयाची देखभाल कुटीर मंडल संस्था करणार असून परिसरातील लोकांना मात्र मोफत सुविधा मिळणार आहे. आमदार प्रभू यांच्या हस्ते शौचालयाचे लोकार्पण झाले. यावेळी उपमहापौर सुहास वाडकर, विधानसभा संघटक प्रशांत कदम, विष्णू सावंत, कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बेले, शाखाप्रमुख सुभाष धानुका तसेच शिवसैनिक, स्थानिक उपस्थित होते.