
जपानची राजधानी टोकयोमध्ये लवकरच ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील नियमावली जाहीर झाली असून खेळाडूंना गाण्यावर, फिरण्यावर इतकेच काय सेक्स करण्यावरही बंदी घातली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. ऑलिम्पिकमध्ये सामील होणार्या खेळाडूंनी पार्टी करू नये तसेच शारिरीक संबंधही ठेवू नये असे नियमावलीत म्हटले आहे. टोकयोच्या क्रीडा ग्राममध्ये सर्व खेळाडूंची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑलिम्पिक दरम्यान खेळाडूंनी सोशल डिस्टन्सचे पालन करणे गरजेचे आहे. या दरम्यान खेळाडूंनी हात मिळवू नये किंवा भेटल्यावर मिठीही मारू नये. तसेच खेळाडूंना सेक्स करण्याचीही परवानगी नाही. प्रत्येक खेळाडूने दोन मीटरचे सोशल डिस्टन्स पाळायचे आहे.
फिरण्यास आणि शॉपिंग करण्यास मनाई
ऑलिम्पिकमध्ये सामील झालेल्या खेळाडूंना टोकयोमध्ये फिरण्यास आणि खरेदी करण्यास सक्त मनाई आहे. इतकेच नाही तर एअरपोर्टवरही इतर ठिकाणी जाण्यास खेळाडूंना मनाई करण्यात आली आहे. खेळाडूंनी सातत्याने मास्क घालणे सक्तीचे आहे. फक्त झोपताना आणि खाताना मास्क काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.
गायचंसुद्धा नाही
जेव्हा ऑलिम्पिकमध्ये खेळ सुरू असेल तेव्हा गाणी गाऊन, घोषणा देऊन प्रोत्साहन देण्यास खेळाडूंना मनाई आहे. जेव्हा ऑलिम्पिकमध्ये खेळ सुरू असतो तेव्हा प्रेक्षक उपस्थित असतात. प्रेक्षक आपल्या खेळाडूंना गाणी गाऊन, घोषणा देऊन प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतात. आता ऑलिम्पिकच्या वेळी प्रेक्षक उपस्थित असणार का यावर अजून निर्णय झालेला नाही.


























































