Tokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड

जपानमध्ये ऑलिम्पिक स्पर्धांना गुरुवारपासून सुरुवात झाली. ऑलिम्पिकमधील डायव्हिंग या स्पर्धेसाठी आशियातून सहा पंचांची (सिंगापूर, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, चीन, जपान आणि हिंदुस्थान) निवड झाली असून यात हिंदुस्थानच्या मयूर जानसुखलाल व्यास (Mayur Jansukhlal Vyas) यांचीही वर्णी लागली आहे. ऑलिम्पिकमधील डायव्हिंग स्पर्धेत ते पंच म्हणून कामगिरी पाहतील.

मयूर जानसुखलाल व्यास हे मुळचे मुंबईचे आहेत. व्यास यांची सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये पंच म्हणून निवड झाली आहे. याआधी 2016 मध्ये झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्येही त्यांनी पंच म्हणून कामगिरी पाहिली होती. विशेष म्हणजे सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पंच म्हणून निवड झालेले व्यास हे एकमेव हिंदुस्थानी पंच आहेत.

व्यास यांनी ऑलिम्पिक व्यतिरिक्त चार वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप, 3 वेळा कॉमनवेल्थ गेम्स, 4 वेळाआशियाई गेम्स, 3 वर्ल्डकप, डायव्हिंग वर्ल्ड सीरिज आणि 4 वेळा दक्षिणपूर्व आशियाई गेम्समध्ये पंच म्हणून काम केले आहे.

ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर

दरम्यान, इतर स्पर्धांपेक्षा यंदाच्या ऑलिम्पिकचा अनुभव वेगळा असल्याचे व्यास म्हणाले. कोविड-19 मुळे सुरक्षिततेचे मार्गदर्शक तत्वे आणि नियम परिश्रमपूर्वक पाळावे लागत आहेत. जपानमध्ये प्रवेश करण्यापूर्वी 14 दिवस आधी शरिराचे तापमान तपासून त्याचा अहवाल आयोजन समितीकडे द्यावा लागला. तसेच प्रस्थान करण्याच्या आधी दोन वेळा (96 तास आणि 72 तास) आयटीपीसीआर चाचणी करण्यात आली. तसेच या चाचण्या अधिकृत आणि मान्यताप्राप्त रुग्णालयातच करण्यात याव्या अशी अटही आयोजन समितीने घातली होती, असेही व्यास म्हणाले.

Tokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने पराभव

तसेच जपानमध्ये दाखल झाल्यानंतर विमानतळावर कोरोनाची आणखी एक चाचणी घेण्यात आली. तसेच स्पर्धेसाठी आलेल्या अधिकाऱ्याला किंवा खेळाडूला हॉटेलमध्ये दाखल झाल्यावर निर्धारित केलेल्या बबलमध्येच रहावे लागते, असेही व्यास म्हणाले. तसेच यंदाची स्पर्धा प्रत्येकासाठी एक आव्हान आहे, पण सर्व काही निभावून नेले जाईल, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या