Tokyo olympic – चक दे इंडिया… असा आहे उपांत्य फेरी गाठणारा हिंदुस्थानचा महिला हॉकी संघ

रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये हिंदुस्थानच्या महिला हॉकी टीमला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. नॉकआऊटमध्येही प्रवेश मिळवता न आल्याने हिंदुस्थानी महिलांचा संघ शेवटच्या स्थानावर बाहेर पडलेला. टोकियो ऑलिम्पिकमध्येही या संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. सुरुवातीच्या सामन्यात सलग तीन पराभव स्वीकारावे लागले होते. मात्र त्यानंतर फिनिक्स भरारी घेत संघाने लागोपाठ तीन विजय मिळवत उंपात्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व लढतीत त्यांनी तीन वेळच्या ऑलिम्पिक चॅम्पियन आणि द्वितीय मानांकित बलाढ्य ऑस्ट्रेलियावर सनसनाटी विजय मिळवला. 41 वर्षांच्या ऑलिम्पिक इतिहासात प्रथमच उपांत्य फेरी गाठलेल्या हिंदुस्थानी महिलांपुढे आज अर्जेंटिनाचे कडवे आव्हान आहे.

साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या सामन्यात हिंदुस्थानसाठी लढणाऱ्या या महिला आजपर्यंत प्रसिद्धी पासून तशा दूरच राहिल्या. मात्र ऑस्ट्रेलियावरील विजयानंतर प्रत्येक हिंदुस्थानीच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर याच दिसत होत्या. यातील अनेक जणी या खेड्यापाड्यातून, नक्षलवादी भागातून, सामान्य ते अतिसामान्य कुटुंबातून आलेल्या आहेत. आज आपण त्या 16 जणींविषयी जाणून घेणार आहोत ज्या हिंदुस्थानची मान उंचावण्यासाठी बलाढ्य अर्जेंटिनाला टक्कर देणार आहेत.

राणी रामपाल – वयाच्या 14 व्या वर्षी कुर्ता पायजमा घालून, तुटलेली हॉकी स्टिक घेऊन राणी मैदानात उतरली होती. आता राणी 26 वर्षांची असून हिंदुस्थानी संघातील महत्त्वाची खेळाडू आहे. राणी ही हरयाणातील शाहबाद येथील आहे. गेल्या अनेक वर्षात राणीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे.

नेहा गोयल – दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून व दारुचे व्यसन असलेल्या वडिलांपासून लांब राहता यावे म्हणून नेहाने हॉकीचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्या आधी नेहा तिच्या आईसोबत एका सायकल कारखाण्यात कामाला जायची. जिथे एका सायकलचे चाक बदलायचे तिला पाच रुपये मिळायचे. नेहा 18 वर्षांची असताना तिला टीम इंडियात संधी मिळाली

निक्की प्रधान – झारखंडमधील नक्षलग्रस्त भागातून आलेल्या निक्की प्रधान हिने तिची पहिली हॉकी स्टिक घेण्यासाठी वेठबिगारीवर काम केले होते. तिचे घर अशा नक्षलग्रस्त भागात होते की ती प्रशिक्षणाच्या वेळी आई वडिलांना भेटायला जायला देखील घाबरायची. रिओ ऑलिम्पिक देखील खेळलेली निक्की ही ऑलिम्पिक खेळणारी झारखंडमधील पहिली खेळाडू आहे.

निशा वारसी – दोन वर्षांपूर्वीच आंतराष्ट्रीय हॉकीमध्ये निवड झालेली निशा ही मूळची हरयाणातील सोनिपतची. निशाचे वडील हे टेलर होते 2015 मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने घराची जबाबदारी निशा व तिच्या आईवर पडली. घराच्या जबाबदाऱ्यांमुळे निशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचायला तीन वर्ष उशीर झाला.

लालरेमसिआमी – हिला तिच्या सहस्पर्धांकडून सिआमी म्हटले जाते. मिझोरामची असलेल्या सिआमीची जेव्हा संघात निवड झाली तेव्हा तिला हिंदी व इंग्लिश बोलता येत नव्हते. ती सांकेतिक भाषेतच सर्वांशी बोलायची. आंतरराष्ट्रीय संघासोबत ऑलिम्पिक खेळणारी मिझोरामची पहिली हॉकी खेळाडू ती ठरली आहे.

सुशीला चानू – सुशीला ही टीम इंडियातील अनुभवी खेळाडू आहे. मणीपूरची असलेली सुशीला ही मुंबईत रेल्वेसाठी काम करते. रिओ ऑलिम्पिकमध्ये ती संघाची कर्णधार होती. तिने हिंदुस्थानकडून एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्समध्ये संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

दीप ग्रेस एक्का – ओडीशातील लुलकिढी येथील असलेल्या एक्काचा मोठा भाऊ व काका देखील हॉकी खेळाडू. ते दोघेही गोलकिपर असल्याने एक्काला गोलकिपर व्हायचे होते. 2017 पासून एक्का टीम इंडियाची सदस्य आहे.

सलिमा टेटे – झारखंडमधील हेसल या नक्षलग्रस्त भागातून आलेली सलिमा हे तिच्या कुटुंबासोबत इतरांच्या शेतात काम करायची. त्या कामातून मिळालेल्या पैशातून तिने तिची पहिली हॉकी स्टिक घेतली होती.

उदिता दुहान – उदिता ही तिच्या वडिलांसारखी हँडबॉल खेळायची. आपण कधी हॉकी खेळू असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र शाळेतील हॉकी कोच अचानक शाळेत यायचे बंद झाले. त्यानंतर तिने हॉकी खेळायचा निर्णय घेतला. 2018 साली ती 18 वर्षाखालील टीमची कर्णधार झाली. वर्षभरानंतर तिची आंतरराष्ट्रीय संघात निवड झाली.

वंदना कटारिया – उत्तर प्रदेशमधील हरिद्वारच्या असलेल्या वंदनाला तिच्या कुटुंबीयांनी हॉकी खेळू दिले त्यामुळे तिच्या कुटुंबाला समाजाचे बोल ऐकावे लागले होते. मात्र तिच्या वडिलांनी तिला कायम साथ दिली. तीन महिन्यांपूर्वीच वंदनाच्या वडिलांचे निधन झाले आहे.

नवनीत कौर – रिओ ऑलिम्पिकदेखील खेळलेली नवनीत ही मूळची हरयाणातील शाहबादची. 2013 साली तिच्या जबरदस्त कामगिरीमुळ ज्युनियर वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानला ब्राँझ पदक मिळाले होते.

मोनिका मलिक – सोनिपत जिल्ह्यातील एका छोट्या गावात जन्माला आलेली. चंदिगडमधील एका सरकारी शाळेत तिने हॉकीचे प्रशिक्षण घेतले. मोनिका हिने कुरुकक्षेत्र विद्यापीठातून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेतले आहे.

गुरुजीत कौर – पंजाबमधील गुरजीत कौर ही एकेकाळी कबड्डी खेळायची. तिच्या शाळेजवळ हॉकीचे मैदाम होते व तिथे काही मुली हॉकी खेळायच्या ते बघून तिलाही हॉकी खेळायची इच्छा झाली.

शर्मिला देवी – शर्मिला देवी हिला हॉकी, वॉलीबॉल व फुटबॉल आवडायचे. मात्र यातून तिने हॉकीची निवड केली.

नवज्योत कौर – नवज्योतच्या वडिलांना त्याचे एक मूल तरी खेळाडू व्हावे असे वाटायचे. त्यामुळे त्यांनी वयाच्या आठव्या वर्षीच नवज्योतला हॉकी खेळायला पाठवले. 2012 साली तिची हिंदुस्थानच्या संघात निवड झाली. तिने रिओ ऑलिम्पिक देखील खेळले आहे.

सविता पुनिया – टीम इंडियाची गोलकिपर असलेली सविता ही हरयाणातील जोधका येथील. जोधका येथे राज्य परिवहन मंडळाच्या बसेसच्या अवजड वस्तू उचलायची. त्यावेळी तिला जो गणवेश घालावा लागायचा. तो गोलकिपरच्या पोषाखासारखा असायचा.

आपली प्रतिक्रिया द्या