टोकियो ऑलिम्पिकवर कोरोनाचा विळखा, क्रीडाग्राममध्ये एक खेळाडू पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टोकियो ऑलिम्पिकवरील कोरोनाचा विळखा आणखी वाढतच चालला आहे. मंगळवारी ऑलिम्पिक क्रीडाग्राममध्ये एका परदेशी खेळाडूसह क्रीडाग्रामबाहेर ऑलिम्पिकची तयारी करत असलेल्या आठ लोकांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ऑलिम्पिक स्पर्धेला आता केवळ दोन दिवस उरलेले असताना ऑलिम्पिकशी संबंध असलेली कोरोनाची रोज नवी आकडेवारी येत असल्याने आयोजकांसाठी हा चिंतेचा विषय बनला आहे.

क्रीडाग्राममध्ये 4 जण कोरोनाबाधित

ऑलिम्पिक क्रीडाग्राममधील कोरोनाबाधितांची संख्या आता 4 झाली आहे. गेल्या शनिवारी या खेळगावात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. ऑलिम्पिकची तयारी करत असलेल्या एका अधिकाऱयाला कोरोनाची लागण झाली होती. रविवारी आणखी दोन खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर मंगळवारी आणखी एका खेळाडूला कोरोनाची बाधा झाली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान येथे 11 हजारांहून अधिक खेळाडू आणि हजारो सपोर्ट स्टाफ वास्तव्यास असणार आहे.

आतापर्यंत 71 जणांना कोरोना

1 ते 20 जुलै दरम्यान खेळाडूंसह ऑलिम्पिकशी संबंध असलेल्या 71 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजकांनी दिली आहे. खेळगावात दाखल झालेल्या कोरोनाग्रस्तांच्या संपका&त आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष संघातील 21 सदस्यांची चाचणी झाली आहे. यामधील तीन जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांना इतर तपासणीतून सूट देण्यात आली आहे.

मेक्सिकोचे दोन खेळाडूही बाधित

मेक्सिकोच्या पुरुष बेसबॉल संघातील दोन खेळाडूंना जपानला येण्यापूर्वीच कोरोनाची बाधा झाली. 31 जुलैला हा संघ ऑलिम्पिकसाठी जपानला रवाना होणार होता. आता स्पर्धा आयोजक या संघाबाबत काय निर्णय घेतात हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र मेक्सिकोच्या या बेसबॉल संघाला ऑलिम्पिकवारीवर निघण्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.