Tokyo Olympics – कास्य पदक हुकले, मात्र हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने रचला इतिहास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लेटोकयो ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकीच्या कास्य पदकासाठी टीम इंडिया व ग्रेट ब्रिटनमध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा 4-3 ने पराभव झाला. शेवटपर्यंत अटितटीच्या झालेल्या सामन्यात हिंदुस्थानच्या मुलींनी गतविजेत्या ग्रेट ब्रिटनला चांगलेच झुंजवले. मात्र तिसऱ्या क्वार्टरमध्ये ग्रेट ब्रिटनने घेतलेल्या एका गोलच्या आघाडीमुळे टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. पदक हुकले असले तरी हिंदुस्थानच्या या लेकींनी इतिहास रचला आहे.

इतिहासात पहिल्यांदाच महिलांचा हॉकी संघ सेमी फायनल मध्ये पोहोचला होता. या सामन्यात सुरुवातीला दोन्ही संघांनी चांगला खेळ करत कुणालाही गोल करू दिला नाही. मात्र दुसऱ्या सत्रात ग्रेट ब्रिटनने 16 व्या व 24 व्या मिनिटाला गोल करत दोन पॉईंट्सची बढत घेतली. त्यानंतर लगेचच गुरजीत कौरने 25 व 26 व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर 29 मिनिटांवर वंदना कटारियाने केलेल्या गोलने टीम इंडियाला ली़ड दिली. त्यानंतर 35 व्या मिनिटाला ब्रिटनच्या होली पियरने गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर 48 व्या मिनिटाला ब्रिटनच्या ग्रेस बाल्सडनने गोल करत टीम इंडियाच्या स्वप्नांना सुरुंग लावला.

टीम इंडियाच्या खेळाडूंचा अश्रूंचा बांध फुटला

शेवटचे सत्र संपल्याचा भोंगा वाजला आणि टीम इंडियाचा पराभव झाला. एवढा जबरदस्त खेळ करूनही एका गोलने टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सर्व खेळाडूंना अश्रू अनावर झाले. सर्व खेळाडू मैदानावर रडताना दिसले. त्यांचे ते अश्रू पाहून सारा देश हळहळला. प्रतिस्पर्धी ब्रिटनच्या खेळाडूंनीही हिंदुस्थानच्या खेळाडूंचे सांत्वन केले