
हिंदुस्थानचे टोकियो ऑलिम्पिकमधील टेबल टेनिस या खेळातील आव्हान मंगळवारी संपुष्टात आले आहे. अनुभवी खेळाडू अचंता शरथ कमल याला ऑलिम्पिक व वर्ल्ड चॅम्पियन मा लाँग याच्याकडून तिसऱया फेरीत हार सहन करावी लागली. त्यामुळे मंगळवारी या खेळातील हिंदुस्थानचा खेळ खल्लास झाला. याआधी जी साथीयान, मनिका बत्रा व सुतिर्था मुखजी यांनाही पराभवामुळे बाहेर व्हावे लागले आहे.
मा लाँग व अचंता शरथ कमल यांच्यामधील पहिला गेम 11-7 अशा फरकाने चीनच्या खेळाडूने जिंकला. पण दुसऱया गेममध्ये हिंदुस्थानच्या खेळाडूने बाजी मारत झोकात पुनरागमन केले. अचंता शरथ कमल याने या गेममध्ये 11-8 असे यश संपादन केले. पण त्यानंतरच्या पुढील तीन गेम चीनच्या खेळाडूने वर्चस्व गाजवले. मा लाँग याने हे गेम 13-11, 11-4, 11-4 अशा फरकाने जिंकले आणि आगेकूच केली.

























































