
हिंदुस्थानच्या पॅरा अॅथलीट्सनी शुक्रवारी दिमाखदार कामगिरी केली. प्रवीणकुमारने उंच उडीत रौप्य व अवनी लेखरा हिने नेमबाजीत कास्य पदकासह या स्पर्धेतील दुसरे पदक पटकावल्यानंतर संध्याकाळच्या सत्रात हरविंदर सिंग याने तिरंदाजीत (वैयक्तिक रिकर्व्ह प्रकार) कास्य पदकाला गवसणी घालत इतिहास रचला. पॅरालिम्पिकमधील तिरंदाजी या खेळामध्ये पदक जिंकणारा हरविंदर सिंग हा हिंदुस्थानचा पहिलाच तिरंदाज ठरला आहे. तसेच हिंदुस्थानने शुक्रवारी तीन पदके पटकावली. एकूण 13 पदकांची कमाई आतापर्यंत हिंदुस्थानने केली आहे.
शेतकरी कुटुंब अन् डेंग्यूमुळे पायांवर परिणाम
हरविंदर सिंग याचा जन्म सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. हरयाणाच्या वैथल येथील गावी त्याचा जन्म झाला. पंजाब विद्यापीठातून त्याने इकोनॉमिक्सची डिग्री मिळवली. दीड वर्षाचा असताना तो डेंग्यूने आजारी पडला. डॉक्टरांकडून इंजेक्शन देण्यात आले, पण याचा त्याच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला. त्याचे पाय व्यवस्थित काम करू लागले नाहीत. इतरांप्रमाणे त्याला हालचाली करता येत नाहीत.



























































