Ganpati Festival 2025 – बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईकर गणेशभक्तांना गणपत्ती बाप्पा पावला आहे. गणेश उत्सवानिमित्त 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी मिळणार आहे. मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल भरावा लागणार नाही.

टोलमाफीसाठी पास दिले जाणार असून संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस व वाहतूक विभागाकडे हे पास उपलब्ध असतील. कोकणात जाण्यासाठी आणि परतीच्या प्रवासासाठी हे पास ग्राह्य धरले जातील. ‘गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन’ या नावाने हा विशेष टोलमाफी पास दिला जाणार असून त्यावर वाहन क्रमांक आणि वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. टोलमाफीमुळे कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना दिलासा मिळणार आहे.