
सलग दोन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसाने शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. प्रमुख महामार्ग, लिंक रोड तसेच इतर अंतर्गत रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने मुंबईकरांचा संपूर्ण रस्ते प्रवासच खड्डय़ात गेला आहे. याचा मोठा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. बुधवारी पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. मुंबईकर अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी अडीच ते तीन तास रस्त्यातच अडकले. महायुती सरकारने केलेल्या रस्त्यांच्या निकृष्ट कामामुळे वाहनधारक, प्रवाशांना हा मनःस्ताप सहन करावा लागला.
दोन दिवसांच्या मुसळधार पावसात पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाची दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी रस्त्याची खडी बाहेर पडली असून खड्डय़ांचे साम्राज्य वाढले आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर सांताक्रूझ, विलेपार्ले, जोगेश्वरी, गोरेगाव-महानंद डेअरी, ओबेरॉय मॉल परिसर, मालाड, कुरार व्हिलेज, बाणडोंगरी, ठाकूर व्हिलेज, मागाठणे आदी भागांत रस्त्याची दुर्दशा झाली आहे. खड्डय़ांतून वाट काढत गाडी चालवणे वाहनचालकांसाठी आव्हान बनल्याने बुधवारी संपूर्ण दिवसभर महामार्गावर वाहनांची काsंडी झाली होती. महामार्गाशेजारील सर्व्हिस रोडची अक्षरशः चाळण झाली आहे. जोगेश्वरी, अंधेरी, गोरेगाव परिसरातील सर्व्हिस रोडवरून महामार्गावरील वाहने जात असल्याने रस्त्यावरील डांबरच पूर्णपणे गायब झाले आहे. त्या भागात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने त्याचा स्थानिक रहिवासी, पादचाऱ्यांना त्रास होत आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर घाटकोपर, मुलुंड, भांडुप परिसरात रस्त्याची वाताहत उडाल्याने या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्याचा ठाणे, नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीला फटका बसला.
अनेक गाड्या मधेच नादुरुस्त
महायुती सरकारने मर्जीतील पंत्राटदारांकडून रस्ते देखभाल-दुरुस्तीची कामे करून घेतली. त्या रस्तेकामातील भ्रष्टाचाराचे पितळ दोन दिवसांच्या पावसाने उघडे पाडले. महामार्गांवरील खड्डय़ांमुळे वाहनांचे बरेच नुकसान होत आहे. बुधवारी जागोजागी अनेक गाडय़ा नादुरुस्त होऊन बंद पडल्या. खड्डय़ांमुळे गाडय़ांचे पार्ट्स खिळखिळे होऊ लागले आहेत. त्यामुळे वाहनधारक सरकारच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त करीत आहेत. अंतर्गत रस्त्यांच्या दुर्दशेचा फटका वाहनचालकांना बसत आहे. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडण्याबरोबर रस्ता खचल्याच्या घटना घडल्या आहेत.