नाताळ-नववर्षाने मालवणच्या पर्यटनाला उभारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समुद्रात सतत येणारी वादळे, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक संकटांमुळे मालवणच्या पर्यटन व्यवसायाला फटका बसला. पर्यटनावर मंदीचे सावट पसरले होते. मात्र, नाताळ सुट्टी व नववर्ष साजरे करण्यासाठी पर्यटकांनी मालवणला पसंती दिल्याने मालवण-तारकर्ली-देवबागचे पर्यटन बहरले आहे. बहुतांश सर्व छोटी-मोठी हॉटेल फुल असल्याचे चित्र आहे. हॉटेल-मालवणी खानावळ तेजीत असून माशांना पर्यटकांची पसंती दिली जात आहे. मासळीचे दर वाढल्याने पर्यटकांचा खर्च वाढला आहे.

मालवण किनारपट्टी पर्यटकांच्या गर्दीने बहरली असून स्कुबा, वॉटरस्पोर्टसाठी गर्दी होत आहे. किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठीही सकाळपासून बंदर जेटी येथे रांगा दिसून येत आहेत. वाहतूक नियोजनासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात आहेत. यावर्षीच्या पर्यटन हंगामाला क्यार चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाचा फटका बसून पर्यटन व्यवसाय कोलमडला असतानाच नाताळ सुट्टीनिमित्त पर्यटकांची रेलचेल वाढल्याने येथील पर्यटन व्यवसायाला काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पर्यटकांची रेलचेल 31 डिसेंबरपर्यंतच राहील असा अंदाज आहे. त्यामुळे पर्यटन वाढीसाठी येथील लोकप्रतिनिधी तसेच नगरपालिका, ग्रामपंचायत यांनी पुढाकार घ्यावा. छोटे मोठे महोत्सव, लोककला, मालवणी खाद्य संस्कृती यांचे आयोजन करावे, अशी मागणी होत आहे. पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गाची पर्यटन राजधानी असलेल्या मालवणला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. मालवण शहरासह तारकर्ली, देवबाग, चिवला आदी ठिकाणी पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटतात.

मालवणात मिळणाऱ्या ताज्या मासळीला पर्यटन हंगामात सर्वाधिक पसंती असते. पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाल्याने हॉटेल व्यावसायिकांकडून पापलेट, सुरमई व अन्य मासळीची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. मात्र माशांची आवक कमी व मागणी वाढल्याने दर वाढले आहेत. त्याचा फटका स्थानिकांसह पर्यटकांना बसत आहे. मालवणात दखल झालेले पर्यटक किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासह दांडी, चिवला बीच, तारकर्ली, देवबाग त्सुनामी आयलंड येथे स्कुबा डायव्हिंग व वॉटरस्पोर्टचा तसेच समुद्रस्नानाचा आनंद लुटत आहेत. रॉक गार्डन येथेही रात्री उशिरापर्यंत गर्दी होत आहे. चिवला बीच येथे वॉटर रोलर आणि बॉडी जुर्बीनग स्पोर्ट साहित्य पर्यटकांच्या दिमतीला आणण्यात आले आहे. घुमडे, मसुरे व अन्य काही गावात ग्रामीण कृषी व धार्मिक पर्यटनही बहरत आहे.