रायगडातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांना सुरक्षाकवच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

पर्यटकांना आकर्षित करणारे रायगड जिल्ह्यातील 24 समुद्रकिनारे आता आणखीन सुरक्षित होणार आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रेस्क्यू टय़ूब, रेस्क्यू कॅन, थ्रो बॅग तर जीवरक्षकांसाठी जॅकेट यांसह 11 प्रकारच्या साहित्याचे वाटप जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने संबंधित नगरपालिका आणि नगरपंचायतींना केले आहे. त्यासाठी 78 लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्राधिकरणाच्या माध्यमातून समुद्रकिनाऱ्यावर 25 जीवरक्षक नेमले जाणार असून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील दुर्घटना टळण्यास मदत होणार असून पर्यटकांनाही समुद्र सफरीचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे.

दोन वर्षांपूर्वी पुण्यातील अबेदा इनामदार महाविद्यालयातील 14 विद्यार्थ्यांचा रायगडच्या समुद्रात बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर मदत व बचाव कार्यासाठी साहित्य पुरवण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आता जिल्ह्यातील 24 समुद्रकिनाऱ्यांसाठी हे साहित्य वाटप करण्यात आले आहे. यात पहिल्या टप्प्यात मेगा फोन, दुर्बिण, टॉर्च, दोरखंड, लाइफ जॅकेट, फायबर स्ट्रेचर, स्कुबा डायव्हींग सेट, जीवरक्षक रिंग, सायरन, उलन ब्लँकेट, सर्च लाईट यासारख्या साहित्याचे वितरण करण्यात आले. तर आता दुसऱ्या टप्प्यात रेस्क्यू टय़ूब, रेस्क्यू कॅन, थ्रो बॅग, जीवरक्षकांसाठी पोषाख, सर्फ रेस्क्यू बोर्ड यांसारखे साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. पर्यटक सुरक्षा अभियानांतर्गत यासाठी 78 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. यातील जवळपास 77 लाख 99 हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत देण्यात आली आहे.

या समुद्रकिनाऱ्यांना मिळणार सुरक्षा
अलिबाग, मांडवा, आक्षी, नागाव, किहिम, रेवदंडा, कोर्ले, मुरुड-एकदरा, मुरुड-जंजिरा जलदुर्ग, काशीद, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगार, सासवणे, आकास, थळ, करसोली, रांजणपाडा डावली, मिळकतखार, कोप्रोली बोडणी, आदगाव, केळास आगार, घारापुरी, नागाव पिरकाडी या 24 ठिकाणचे समुद्रकिनारे सुरक्षित होणार आहेत.