
आमच्याकडे आर्थिक गुंतवणूक करा, तुम्हाला जादा परतावा देऊ असे सांगून मार्केट यार्डातील छोटय़ा-मोठय़ा शेकडो आडतदार, व्यापाऱयांची 125 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. पुणे बाजार समितीचे माजी संचालक अनिल देवढे यांच्यासह अन्य दोघांनी ही फसवणूक केल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी पत्रकार परिषदेत केला.
अनिल देवढे हे मार्केटयार्डातील मोठे आडतदार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीत ते संचालकही होते. त्यांनी मार्केटयार्डातील छोटय़ा-मोठय़ा आडतदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून गेल्या चार ते पाच वर्षांत त्यांनी 100 ते 125 कोटी रुपये जमा केले. सुरुवातीला चांगला परतावा दिला. मात्र, वर्षभरानंतर देवढे यांच्याकडे मोबदल्याची मागणी केली असता, त्यांनी आज देतो, उद्या देतो असे म्हणून पैसे देणे टाळले. प्रत्येक आडत्याला वेगवेगळी कारणे देण्यास व दमबाजी केल्याचे आडत्यांनी सांगितले.
अनिल देवढे हे मिसिंग असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी मार्केटयार्ड पोलीस्टेशनमध्ये दाखल केली. ही गोष्ट संशयास्पद वाटल्याने गुंतवणूकदार आडतदार मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीसंदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी गेले. मात्र, पोलिसांकडून कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचे राजशेखर पाटील यांनी सांगितले.




























































