
सामना प्रतिनिधी। अलिबाग
सलग तीन दिवस आलेल्या सुट्टीने पर्यटक रायगडात दाखल झाले असून आता परतीच्या मार्गावर निघाल्याने मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. माणगाव, वडखळ, कोलाड रस्त्यावर वाहतूक कोंडीत पर्यटक अडकले आहेत.
सलग तीन दिवस आलेल्या सुट्टीने पर्यटक रायगडात दाखल झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील समुद्र किनारे फुलले होते. आज रविवारी सुट्टीचा आनंद घेऊन पर्यटक पुन्हा मुंबईकडे निघालेले आहेत. त्यामुळे महामार्गावर पर्यटकांच्या वाहनाची संख्या वाढलेली आहे. माणगाव ते लोणारे, वडखळ ते पेण दरम्यान सर्वाधिक वाहतूक कोंडी झालेली आहे.
मुंबईकडे जाणाऱ्या वाहनाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने वडखळ ते पेण, लोणारे ते माणगाव दरम्यान दोन ते तीन किमीच्या रांगा वाहनाच्या लागलेल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र वाढलेल्या वाहनांमुळे वाहतूक सुरळीत होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे परतीच्या मुंबई प्रवासात प्रवाशांचा वाहतूक कोंडीचा खोळंबा झाला आहे.




























































