उरणमध्ये ट्रँफिक जँमची समस्या गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मधुकर ठाकूर । उरण

उरण शहर व परिसरात वाहतुकीची समस्या दिवसें दिवस जटिल बनत चालली असून उरण शहरात तसेच, उरण पनवेल मार्गावर करळ फाटा, जासई, गव्हाण फाटा तसेच वाशी बेलापुर कडे जाणाऱ्या उलवे, वहाळ, तरघर आदि ठिकाणी ट्रँफिक जँमची समस्या मोठ्या प्रमाणात होत आहे. येथे रस्त्यावर तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या व बेकायदेशीरपणे उभ्या असलेल्या ट्रक, कंटेनर, फोर व्हीलर, टेंपो आदि वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

उरण परिसरातुन नोकरी,उच्च शिक्षणासाठी, शॉपिंगसाठी खूप मोठ्या प्रमाणात जातात. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे असलेल्या बेकायदेशीर वाहनांमुळे अनेकवेळा ट्ँफिक जँमची समस्या उदभवते. त्यामुळे प्रवास करताना प्रवासी, वाहन चालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे प्रवाशांचा अमूल्य वेळ वाया जात आहे. शिवाय एखाद्या हार्टअटॅक सारख्या गंभीर आजाराने पीडित असलेल्या व्यक्तीला एम्बुलेंसमधून नवी मुंबई, मुंबई, पनवेलला नेताना वाहन चालकाला रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. योग्य वेळेवर उपचार अभावी ट्रँफिक जँममध्ये एखादा रुग्ण दगावण्याची शक्यताही नाकारता येत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूस उभ्या असलेल्या वाहनांमुळे खूप मोठ्या प्रमाणात ट्रँफिकची (वाहतुकीची) समस्या निर्माण होत आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनर, ट्रक, टेंपो, फोर व्हीलर आदी वाहनांवर कायदेशीर कारवाई होत नसल्याने ट्रँफिकची समस्या उग्र रूप धारण करीत असल्याचे चित्र सध्या उरणमध्ये दिसत आहे. उरण शहरात तर ठिकठिकाणी सुरु असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामांमुळे वाहतूककोंडी शहरवासियांसाठी डोकेदुखी ठरू लागलीआहे. वाहतूककोंडीला वेळीच आळा घालण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मात्र याकडे ट्रँफिक नियंत्रण विभागाचे अधिकारी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे समस्या आणखीच गंभीर बनत चालली असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.