मुंबई – गोवा महामार्गावर गॅस टँकर अपघाताने वाहतूक ठप्प

1

सामना प्रतिनिधी । अलिबाग

मुंबई गोवा महामार्गावर पेण खारपाडा पुलाजवळ एलपीजी गॅस घेऊन जाणारा टँकर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक आठ ते दहा तास विस्कळीत झाली होती. त्यामुळे मुंबई कडून कोकणात जाणाऱ्या व येणारी प्रवाशांची वाहने पेण खोपोली मार्गे वळविण्यात आली होती. त्यामुळे या अपघाताने प्रवाशाना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. अग्निशमन दलाचे 8 बंब मदतीसाठी घटनास्थळी दाखल होऊन पाण्याचा मारा करून गॅस कुलिंगचे काम सुरू होते. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक बारा तासानंतर सुरळीत सुरू झाली आहे.

मुंबई गोवा महामार्गावर पेण खारपाडा पुलाजवळ मध्यरात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास एलपीजी गॅस टँकर चालक खाजगी पार्किंग मध्ये टँकर लावत होता. त्यावेळी रिव्हर्स घेत असताना मातीच्या ढिगाऱ्यावरून टँकर घसरून पलटी झाला. गॅस टँकर पलटी झाल्यामुळे त्या मधुन प्रोपेन गँस लिक होण्यास सुरुवात झाली होती. अपघातानंतर पेण नगरपरिषद अग्निशमन दल, एम.आय. डी. सी अग्निशमन दल, रिलायन्स अग्निशमन दलाच्या 8 गाड्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

टँकर मधून गॅस गळती झाली असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही बाजूंची वाहतूक पोलिसांनी बंद केली होती. त्यामुळे कोकणात जाणारी वाहतूक पळस्पे, आपटा खोपोली मार्गे वळविण्यात आली होती. तर लिक झालेले गॅस व टँकरवर पाण्याचा मारा करून कुलिंग करण्याचे काम अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आले होते.

पलटी झालेल्या गॅस टँकर मधील गॅस दुसऱ्या कॅप्सूल मध्ये भरल्यानंतर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक 12 तासाने वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. या अपघातामुळे मुंबई व कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मात्र वळण रस्त्याचा वापर करून प्रवास करावा लागला.