चिपळुणातील वाहतूक कोंडीची समस्या वाढली; नगरपरिषदेची कारवाई थांबल्याने अनधिकृत फेरीवाले वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर शहरात दिवसेंदिवस रस्त्यावर होत असलेली वाहनांची गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे ज्येष्ठ नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. त्यातच नगरपरिषदेची कारवाई थांबल्याने अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. त्याशिवाय दुकानदारांची वाढीव बांधकामे आणि अतिक्रमणे पाहता चिपळूण शहरातील स्थिती गंभीर झाली असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते तानू आंबेकर यांनी पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्याकडे केली आहे.

याबाबत तानू आंबेकर यांनी पोलीस अधिक्षकांकडे केलेल्या तक्रारीनुसार, काही वर्षांपुर्वी चिपळूण शहरासाठी विशेष वाहतूक शाखा कार्यरत होती. तिचे नियमन करण्यासाठी पुरेसे कर्मचारी आणि नियंत्रणासाठी पीएसआय दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली होती. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक राकेशसिंह परदेशी यांनी वाहतूक नियंत्रणात मोलाची कामगिरी बजावली होती. त्याने शहरातील वाहतूकदारांना शिस्त लागली होती. मात्र, सध्या वाहतूक शाखेची नियमावली मोडीत निघाल्याचे दिसत आहे. वाहतूक शाखेसाठी स्वतंत्र अधिकारी आणि पुरेसे कर्मचारी नाहीत. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी कोणतीही दखल घेत नाहीत. तेव्हा याप्रश्नी गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी आंबेकर यांनी केली आहे.

सद्यस्थितीत शहरात वाहतूक शाखेचे केवळ तीन पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु, वाहतूक नियंत्रण करण्यासाठी किमान 15 पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. शहरातील मोकाट जनावरे आणि गाढवांचा वावर व अमर्याद वाढलेले श्वान व रस्त्यालगत झालेले अतिक्रमण सर्वसामान्य नागरिकांना डोकेदुखी ठरत आहे. अनेक दुकांनासमोर बेशिस्तपणे अनधिकृत स्टॉल थाटले गेले आहेत. त्यासाठी काहींनी शेड उभारली आहेत. मात्र, त्याकडे नगर परिषदेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे आंबेकर यांनी म्हटले आहे.