
कर्जत शहरात आज पुन्हा एकदा आठवडे बाजारच्या दिवशी ऊस वाहतूक करणाऱया ट्रक व ट्रक्टरमुळे वाहतूक ठप्प झाली. मकर संक्रांतीच्या निमित्ताने भरलेल्या आठवडे बाजारामुळे शहरात प्रचंड गर्दी झाली होती. त्यातच कर्जत शहराला अद्याप बायपासचा पर्याय उपलब्ध नसल्याने मुख्य रस्त्यावरूनच मोठय़ा प्रमाणावर ऊस वाहतूक करणारे डबल ट्रॉली ट्रक्टर व ट्रक ये-जा करत असल्यामुळे शहरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.
दिवसभर शहरातील मुख्य रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याचा सर्वाधिक फटका कर्जत येथील व्यापाऱयांना बसला. ग्राहकांना बाजारात येणे अवघड झाले, तर अनेक व्यापाऱयांचा व्यवसाय ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
शहरातून मोठय़ा प्रमाणात बाहेर जाणारी ऊस वाहतूक ही रोजच वाहतूककोंडीचे कारण ठरत आहे. त्यातच रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे उभ्या केलेल्या वाहनांमुळे परिस्थिती आणखी गंभीर बनते. पोलीस यंत्रणेवर ताण येतो, तर नागरिकांना वेळेत कामावर, शाळा-कॉलेज किंवा रुग्णालयात पोहोचणे कठीण होते.
दरम्यान, आठवडे बाजारच्या दिवशी ऊस वाहतूक करणारे ट्रक व ट्रक्टर यांना शहरात प्रवेश करण्यास बंदी घालावी किंवा पर्यायी मार्गाने ही वाहतूक वळवावी, अशी मागणी नागरिक व व्यापारी वर्गातून होत आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावेत, अन्यथा कर्जत शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न आणखी गंभीर होईल, असा इशारा नागरिकांकडून दिला जात आहे.
कर्जत बायपास कधी होणार?
या पार्श्वभूमीवर कर्जत बायपास कधी होणार, असा सवाल आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि वाहनांची संख्या पाहता, मुख्य रस्ता कितीही रुंद केला तरी तो अपुरा पडणार असल्याचे नागरिकांचे मत आहे. त्यामुळे शहराच्या बाहेरून तातडीने बायपास रस्ता काढण्याची मागणी होत आहे. बायपास झाल्यास शहराशी संबंधित नसलेली अवजड वाहने बाहेरूनच मार्गक्रमण करतील आणि शहरातील वाहतूककोंडी मोठय़ा प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


























































