पैसे घेऊन गाडी सोडणारा वाहतूक पोलीस निलंबीत; वाहतूक उपायुक्तांचे आदेश

पुण्यात जॅमर कारवाई केलेल्या गाडी मालकाकडून नियमानूसार दंड वसूल न करता तडजोडीअंती दीड हजार रुपये खिशात घालणाऱ्या वाहतूक पोलिसाला सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. विक्रम फडतरे (नेमणूक, भारती विद्यापीठ वाहतूक शाखा) असे निलंबीत करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता बालाजीनगर येथील पंपामध्ये सागर राऊत (रा.राजेवाडी, ता खंडाळा, ज़ि सातारा) यांनी त्यांची महिंद्रा मॅक्स गाडी लावली होती. यावेळी या भागात कर्तव्यावर असलेल्या फडतरे यांनी राऊत यांच्या गाडीला जॅमर लावला. यानंतर त्यांना 5 हजारांची पावती करण्याचे सांगितले. मात्र, तडजोडीअंती दीड हजार रुपये घेऊन जॅमर काढून गाडी सोडून दिली. याबाबत राऊत यांनी वाहतूक शाखेकडे तक्रार केली होती. याची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाची चौकशी केली. यात तथ्य आढळून आल्याने फडतरे यांच्यावर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी शुक्रवारी निलंबनाची कारवाई केली. पोलीस कर्मचारी फडतरे यांच्याविरोधात तक्रार आली होती. याची दखल घेत तपासणी करण्यात आली. तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्याने फडतरे यांना सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे ,असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या