
वाहतुकीच्या नियमांचे पालन करा अशा पोलिसांकडून वारंवार सूचना होत असतानाही चालक मात्र बिनधास्त ट्रफिक नियम मोडीत असल्याचे सर्वत्र चित्र आहे. राज्यात सर्वत्र नियम मोडले जात असताना नागपूरकर मात्र नियम मोडण्यात अव्वल ठरले आहेत.
राज्यात पोलिसांकडून ‘वन स्टेट-वन चलान’ ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेंतर्गत वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर ई-चलान करण्यात येत आहे. ओव्हर स्पीड, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, मालवाहू वाहनातून प्रवाशांची वाहतूक करणे, सिग्नल तोडणे आणि दारू पिऊन गाडी चालवणे हे नियम मोडणाऱयांना मुख्यत्वेकरून पोलिसांनी लक्ष्य केले आहे. असे प्रकार करणाऱया चालकांकडून अपघाताची भीती जास्त असते. त्यामुळे त्यांना अटकाव करून पुढचा धोका टाळण्यासाठी पोलिसांनी त्यांचे परवाना निलंबित करण्याचे हत्यार उपसले आहे.
काही चालकांवर वारंवार कारवाई करण्यात येत असून काही चालक अतिरेक करताना आढळून येत आहेत. त्यामुळे अशा जवळपास 45 हजार वाहनचालकांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित केल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई यापुढेदेखील अशीच सुरू राहणार असल्याचे महामार्ग पोलीस विभागाचे अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले.
पोलिसांनी – मुंबई – 26, पुणे – 1430, रायगड – 2488 आणि नागपूर- 3795 जणांवर कारवाई केली आहे.

























































