मोदींच्या गुजरातमध्ये ट्रॅफिक नियम बदलले; ट्रिपल सीटची परवानगी, हेल्मेट सक्तीपासून सूट

1686

केंद्र सरकारकडून एक सप्टेंबरपासून नवीन मोटार वाहन कायदा लागू करण्यात आला. ज्याअंतर्गत ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन केल्यास भरभक्कम दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये मात्र याच कायद्यात बदल करत राज्य सरकारने नियम शिथील केले आहेत.

गुजरात राज्यसरकारने जारी केलेल्या नवीन वाहतूक नियमांनुसार, ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन केल्यास भरावा लागणारा दंड कमी करण्यात आला आहे. तसेच ट्रिपल सीटला परवानगी देण्यात आली आहे. तसेच शहरी प्रदेशात हेल्मेट घालण्याच्या सक्तीतून सूट देण्यात आली आहे. फक्त महामार्गावर हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या नियमांनुसार हेल्मेट न वापरणाऱ्यास 1 हजार रुपयांचा दंड आहे, मात्र गुजरातमध्ये हाच दंड पाचशे रुपये इतका कमी करण्यात आला आहे. ट्रिपलसीटसाठी असणाऱ्या एक हजार रुपये दंडातही बदल करण्यात आला असून तो दंड फक्त 100 रुपये इतका करण्यात आला आहे. याखेरीज, अन्य वाहतूक नियम उदा. विनापरवाना ड्रायव्हिंग, गाडीचा विमा नसणे, पीयूसी प्रमाणपत्र नसणे किंवा दारू पिऊन गाडी चालवणे यांसाठीच्या दंडाची रक्कमही घटवण्यात आली आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. हा निर्णय जनहितार्थ घेतला आहे, असं रुपानी यांनी म्हटलं आहे. अनेक ठिकाणी गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं गुजरात सरकारचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या