दिलीप साहेबांच्या जाण्यामुळे मी पूर्णपणे कोसळलेय, सायरा बानो झाल्या भावूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार आणि सायरा बानो हे बॉलीवूडमधील एव्हरग्रीन कपल म्हणून ओळखले जाते, मात्र दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा बानो यांना मोठा धक्का बसला असून या धक्क्यातून त्या अजूनही साकरल्या नाहीत. दिलीप साहेबांच्या जाण्यामुळे मी एकाकी पडलेय, पूर्णपणे कोसळलेय. या दु:खातून बाहेर पडणे माझ्यासाठी शक्य नाही, अशी भावना नुकतीच सायरा बानो यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली आहे.

सायरा बानो म्हणाल्या, मी त्यावेळी त्यांचे सारं काही खूप आनंदाने करायचे. आम्ही एकत्र होतो त्यावेळी दिलीप साहेबांसोबत घरी राहणे मला खूप आवडायचे. बाहेर फिरायला जाणे, पार्टीत मिरवणे मला पहिल्यापासूनच पसंत नाही. आताही घरातून बाहेर पडण्याची माझी इच्छा होत नाही. या दुःखातून मी कधी सावरू शकेन हे मला माहीत नाही, पण जीवनात आता मला साहेबांची खूप जास्त गरज वाटतेय. पुढे त्या म्हणाल्या, मी सध्या फक्त जवळच्या मित्रपरिवारालाच कधीतरी भेटते. खरंतर मी भाग्यवान आहे की, माझ्या अवतीभवती विचारपूस करणारे लोक आहेत. आता मी योगा, ध्यानसाधना आणि प्रार्थना करते. त्यामुळे मला मनःशांती मिळते.