
आपल्यापैकी अनेकांनी रेल्वेने प्रवास केला असेल. रेल्वेने प्रवास करत असताना आपल्याला रेल्वे रुळाच्या खाली एकसारखी खडी (छोटे दगड) टाकलेली दिसतात. यामागचं नेमकं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आज आम्ही तुम्हाला याबद्दलच माहिती सांगणार आहोत.
छोट्या दगडांना (एकत्रितपणे) तांत्रिक भाषेत ट्रॅक ब्लास्ट असे संबोण्यात येते. हे मूलतः ट्रॅकबेड (एक प्रकारची खडीची गादी) तयार करते ज्याच्यावर स्लीपर ठेवलेले असतात. आता स्लीपर म्हणजे काय तर ही एक आयताकृती बीम आहे. जी रेल्वे रुळांना काटकोनात छेदते. साधारणपणे स्लीपर ही लाकडी अथवा प्रीस्टरेसडं काँक्रिट या पदार्थ स्वरूपात असते. यापैकी दुसऱ्या प्रकारातील स्लीपर ही जास्त बघण्यास मिळते. रेल्वे स्लीपर चा मुख्य हेतू हा रेल्वे रुळांना सरळ स्थितीत ठेवण्यासाठी होतो.
आता ट्रॅक ब्लास्ट कडे वळूयात. ट्रॅक बलास्ट ही एक अशी खडी असते जीच्यात धारदार आणि किनार असलेले दगड वापरले जातात. ज्याच्यावरून रेल्वे धाऊन गेली तरी ते ट्रॅकच्या खालून निसटून जात नाहीत आणि रेल्वे रूळांसाठी एक स्थीर पाया म्हणून काम करतात. हे सर्व त्यांच्या अशा विशिष्ट आकाराने अथवा संरचनेमुळे शक्य होते.
ट्रॅक बलास्ट नेमके कशे उपयोगाचे आहे त्याची काही कारणे
1. सर्वप्रथम जेव्हाही कधी अवजड ट्रेन्स रुळांवरून धावतात तेव्हा ट्रॅक ब्लास्ट हे सुनिश्चित करते की, रूळ त्यांच्या ठरलेल्या जागीच राहतील. त्यांच्यात कुठल्याही प्रकारचे विक्षेपण (डिफ्लेक्शन) येणार नाही.
2. ट्रॅक ब्लास्ट हे रुळांखाली अथवा त्यांच्यासभोवताली कुठल्याही प्रकारच्या वनस्पती अथवा गवत उगवू देत नाही जेणेकरून रुळाखालची माती भुसभुशीत होणार नाही.
3. ट्रॅक ब्लास्टचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे ट्रॅकच्या जवळपास साचलेल्या पाण्याला ट्रॅकच्या खाली घुसण्यापासून रोकणे. त्याकरिता ते एक सिल सारखे काम करते. याचा अर्थ ते 100 टक्के पाणी रोकुन धरते असाही होत नाही परंतु ते रुळाखाली आलेल्या पाण्याला ड्रेन आऊट करते जेणेकरून खालच्या जमिनीची एकसंधता टिकून राहील.
4. वाहतूकीसाठी रेल्वेमार्गाच्या अतिरीक्त वापरामुळे ट्रॅकच्याजवळ असलेल्या परिसरातील इमारतींना धोका निर्माण होतो. कारण उच्च गति लोकोमोटिव्ह त्यांच्या हालचालीने प्रचंड कंपने निर्माण करतात आणि त्यामुळे गोंगाट ही निर्माण होतो. ट्रॅक ब्लास्टचा उपयोग इथे कंपने मोठ्या प्रमाणात कमी करण्यासाठी आणि गोंगाट देखील कमीतकमी कमी पातळीवर आणण्यासाठी केला जातो.
कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना तुषार सोनवणे यांनी ही माहिती दिली.

























































