
ऐन सणासुदीत रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेकडून एक आनंदाची बातमी दिली आहे. रेल्वेने एक नवीन योजना सुरू करण्याचे ठरवले असून या योजनेचे नाव राऊंड ट्रिप पॅकेज असे आहे. या योजनेअंतर्गत कोणताही प्रवास येण्या-जाण्याचे तिकीट एकाचवेळी बुक करत असेल तर त्या प्रवाशाला परतीच्या तिकिटावर 20 टक्के आकर्षक सूट दिली जाणार आहे. यामुळे केवळ प्रवाशाला स्वस्त प्रवास मिळणार नाही तर गर्दी टाळण्यासाठी नियोजन करणेही शक्य होईल. भारतीय रेल्वेने सण-उत्सव डोळ्यासमोर ठेवून ही योजना आणली आहे.
जर कोणताही प्रवासी येण्या-जाण्याचे तिकीट एकत्रित बुक करत असेल तर रेल्वे प्रवाशाला प्रवासाच्या बेस भाड्यावर 20 टक्के सूट दिली जाणार आहे. ही सूट त्याच प्रवाशाला मिळेल. ज्या प्रवाशाचे नाव येण्या आणि जाण्याच्या तिकिटावर आहे. 20 टक्के सूट मिळणाऱ्या व्यक्तीकडे येण्या आणि जाण्याचे तिकीट असायला हवे. तसेच एकाच क्लासचे आणि येण्या-जाण्यासाठी एकाच रेल्वे स्थानकाचे नाव असायला हवे. या योजनेअंतर्गत रेल्वे प्रवासी 13 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2025 पर्यंत जाण्याचे तिकीट काढू शकतो. तसेच येण्यासाठीचे तिकीट 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 पर्यंत काढू शकतो. या कालावधीत तिकीट काढले तरच प्रवाशाला 20 टक्के सूट मिळू शकणार आहे. येण्या आणि जाण्याचे तिकीट कन्फर्म असणे आवश्यक आहे. या तिकिटात कोणतेही बदल करता येणार नाहीत. तसेच रिफंडची सुविधासुद्धा दिली जाणार नाही. रिटर्न तिकिटावर कोणतीही सूट, व्हाऊचर, पास किंवा रेल्वे ट्रव्हलचे कूपन लागू होणार नाहीत. ही योजना सर्व क्लास आणि ट्रेनला लागू आहे. यामध्ये स्पेशल ट्रेनचा समावेश आहे. दोन्ही तिकीट एकाच माध्यमातून बुक करावे लागतील. म्हणजे एक तर ऑनलाइन किंवा ऑफलाइन (तिकीट खिडकी) वर जाऊन.
आधी तिकिटात वाढ
रेल्वेने 1 जुलै 2025 पासून नवीन टॅरिफ लागू केला आहे. मेल, एक्स्प्रेस ट्रेनमधील नॉन एसीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता प्रति किलोमीटर 1 पैसे जास्त भाडे द्यावे लागणार आहे, तर एसीने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला प्रति किलोमीटर 2 पैसे जादा मोजावे लागतील. सेकंड क्लासने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 500 किलोमीटरपर्यंत प्रवास मोफत असून त्यानंतरच्या प्रति किलोमीटरसाठी अर्धा पैसा जास्त मोजावा लागणार आहे.