शिक्षकांचीच भरली शाळा; रायगडात भरले अनोखे वर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महेंद्र माने I नागोठणे

कोरोना महासंकटाच्या काळात बंद असलेल्या शाळांच्या घंटा पुन्हा घणघणू लागल्या आहेत, मात्र ज्या मुलांनी साधी बालवाडीही पहिली नाही अशा पाहिलीत जाणाऱ्या आणि पहिल्यांदाच शाळेची पायरी चढणाऱ्या मुलांना दडपण येऊ नये, त्यांना शाळा आपली वाटावी यासाठी काय करावे याचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेने शिक्षकांचीच “शाळा” घेतली. शाळांची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने खास हा उपक्रम सुरु केला असून शिक्षकांना शाळापूर्व तयारीचे खास प्रशिक्षण देण्यात आले.

कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे अंगणवाडी बंद होत्या.त्यामुळे विद्यार्थी अंगणवाडीतील शिक्षणापासून वंचित झाले होते. कधीही शाळा बघितली नसलेले हे विद्यार्थी प्रथमच पहिलीच्या वर्गात प्रवेश करणार आहेत. त्यांची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने शाळा पूर्व तयारी हा विशेष उपक्रम राबविला असून त्याचे तालुकास्तरीय प्रशिक्षण रोहा येथे घेण्यात आले.यात कचेरी शाळा शिक्षिका स्वाती पाटील व जोगेश्वरीनगर शिक्षिका मंगला खाडे या सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर नागोठणे केंद्राचे केंद्रस्तरीय प्रशिक्षण कचेरी शाळेत पार पडले. यावेळी शिक्षिका स्वाती पाटील व मंगला खाडे यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. यामध्ये शाळा कधीही न बघितलेल्या विद्यार्थ्यांना पहिलीच्या वर्गात प्रवेश घेताना भीती वाटू नये, दडपण येवू नये,उत्साही वातावरणात त्यांचे स्वागत व्हावे त्यासाठी वेगवेगळ्या स्टॉलचे आयोजन कसे करावे तसेच स्वागत कक्षापासून विविध स्टॉलवर त्यांच्या पूर्वज्ञानाची तपासणी कशी करावी,विविध कार्यक्रमांचे आयोजन कसे करावे,त्यासाठी स्वयंसेवक,अंगणवाडी सेविका,पालक व शिक्षणप्रेमी यांचे सहकार्य कसे घ्यावे याची माहिती व प्रात्यक्षिक स्वाती पाटील व मंगला खाडे यांनी दिले. केंद्रप्रमुख नयना मुदगुले यांनीही मार्गदर्शन केले.