
नैसर्गिक आणि मानवी आपत्तीत जीव रक्षणार्थ धावून येणारे तृतीयपंथींचे पथक आता सज्ज होत आहे. यानिमित्ताने पुरुष, महिलांपाठोपाठ आता कोल्हापुरातून आणखी एका धाडसी बचाव पथकाची सुरुवात होत आहे. तृतीयपंथी आता कोणत्याही क्षेत्रात गुणवत्तेच्या जोरावर काम करू शकतो हे यातून स्पष्ट होते.
महापूर, भूकंप वा कोणतीही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडील आपदामित्र आणि आपदासखी जीव धोक्यात घालून बचावकार्यासाठी झोकून देऊन काम करतात. आता त्यांच्या जोडीला समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला असलेला तृतीयपंथी घटक जोडला गेला आहे. येथील आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून या तृतीयपंथीयांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन आपत्तीसाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. दहाजणांचे हे पथक आता कोणतीही आपत्ती ओढवल्यास बचावकार्यासाठी एक पाऊल पुढे असणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या विशेष प्रयत्नातून येथील तृतीयपंथीयांच्या हक्क आणि अधिकारांसाठी काम करणाऱ्या मैत्री संघटनच्या प्रमुख मयूरी आळवेकर, शिवानी गजबर, झोया दिन्नी, सुलभा, वैशाली, मोगरा या तृतीयपंथीयांना मोटर बोट कशी चालवावी, तलाव, नदीच्या पाण्यात बुडणाऱ्यांना बाहेर कसे घ्यावे, व्यक्तीला शुद्धीवर आणण्यासाठी प्रथम उपचार कसे द्यावेत, बोट तयार कशी करावी, तयार केलेली बोट परत डिफ्लेक्ट कशी करावी, याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण राजाराम तलाव येथे देण्यात आले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकातील कृष्णात सोरटे, प्रथमेश येरुडकर, रोहित जाधव, सोमनाथ सुतार, शैलेश हांडे, प्रीतम केसरकर, सुदेश चव्हाण, आदिनाथ कांबळे यांच्यासह आपदा मित्र आणि सखींनी हे प्रशिक्षण दिले. जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर आपत्ती ओढवल्यास दहा तृतीयपंथीयांचे
रेस्क्यू पखक सज्ज झाले आहे.
तृतीयपंथी आता कोणत्याही क्षेत्रात गुणवत्तेच्या जोरावर काम करू शकतो. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध स्तरावर प्रयत्न करीत आहे. विविध शासकीय व इतर क्षेत्रात काम करणारे एनजीओच्या माध्यमातून तृतीयपंथीयांच्या हक्क आणि अधिकारासाठी प्रयत्न केले जातात. कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्या प्रयत्नाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी नगरीतून पुन्हा एकदा जगभरात सर्वसमावेशकतेचा विचार पेरला जातो, ही अभिमानाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया मैत्री संघटनेच्या अध्यक्षा मयूरी आळवेकर, सुहासिनी देवमाने यांनी व्यक्त केली.























































