
मुंबईतील शहराच्या सीमा विस्तारलेल्या आहेत. त्यामुळे मुंबईत शहरापुरता विषय मर्यादित न ठेवता उपनगरातल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी इमारत दुरुस्ती मंडळ स्थापन करण्यात येईल, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज विधानसभेत दिली.
मुंबईतील म्हाडाच्या शहर विभागात असणाऱया उपकरप्राप्त इमारती आहेत. त्या पुनर्विकासाला गेल्यानंतर तीन वर्षांत कामाला सुरुवात झाली नाही. पुनर्विकासाचा प्रस्ताव रखडला तर त्या म्हाडा ताब्यात घेऊन पुनर्विकास करेल, अशी सुधारणा कायद्यात करण्यात आली. यासंदर्भात मांडलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास सुधारणा विधेयकावरील चर्चेत अँड. आशिष शेलार, अमिन पटेल, सदा सरवणकर, अतुल भातखळकर, पराग अळवणी तसेच सुनील प्रभू यांनी भाग घेतला. मुंबई शहरातील उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास वेगाने व्हावा म्हणून शासन विचार करते आहे, त्याच धर्तीवर मुंबईच्या उपनगरातील इमारतीच्या पुनर्विकासाचा विचार व्हाका, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. वांद्रे पश्चिम येथील म्हाडा संक्रमण शिबीराच्या पुनर्विकासाचे काम रखडले असल्याकडे त्यांनी गृहनिर्माणमंत्र्याचे लक्ष वेधले.
या चर्चेला उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मुंबई शहरातील संक्रमण शिबिरांसाठी जागा शिल्लक राहिली नाही. मुंबई पोर्ट ट्रस्टची 25 एकर जागा मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करू. वांद्रे पश्चिम येथील म्हाडा संक्रमण शिबीराच्या पुनर्विकासाचे रखडलेले विषय एका महिन्यात मार्गी लागतील असे आव्हाड यांनी यावेळी सांगितले.
ओपन स्पेसमुळे अडचण
म्हाडा इमारती शेजारी असणाऱया जागेचा अधिकाऱयांनी मोकळी जागा (ओपन स्पेस) असा अर्थ लावल्याने या इमारतींच्या रखडलेल्या कन्वेन्स डिड याकडे सरकारचे लक्ष वेधले.
ओपन स्पेसमध्ये स्पष्टता
आवश्यक ती मोकळी जागा म्हणजे किती जागा याबाबत स्पष्टता आणली जाईल व हा प्रश्न निकाली काढू असेही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

























































