
>> विजय बेंद्रे
अनुवाद’ हा दोन भाषांना, दोन संस्कृतींना जोडणारा असतो. समृद्ध करणारा असतो. कारण ज्या भाषेतून तो येतो त्याची वैशिष्टये तो घेऊन येतो. याच आकलनातून आलेला वस्तुनिष्ठ भेद मांडणारा लेख.
काही पुस्तक संग्राहक अनुवादित पुस्तकांसाठी त्यांच्या शेल्फमध्ये एक स्वतंत्र विभाग ठेवतात. मग त्याच विभागात अनेक उपविभाग. त्यामध्ये आवडीनुसार जगातील कुठल्याही भाषेतील अनुवादित पुस्तकांची गर्दी असते. अशा शेल्फच्या अनुवादित पुस्तकांच्या कुठल्याही विभागात डोकावून पाहिलं की मला माझ्या मातृभाषेच्या व्यावहारिक समतोलपणाची जाणीव नीट समजून घ्यावी असे वाटते. दुसऱया भाषेतील एकूणच मांडणीला मी माझ्या आकलनाच्या प्रवाहात कसे सामावून घेणार आहे यावर मी अधिक विचार करतो. तो विचार भावनिक आणि वस्तुनिष्ठतेच्या समान पायाभूत संकल्पना धरून असतो की नाही हे त्या त्या कलाकृतीच्या आस्वादावर ठरते.
माझ्या शेल्फमधील काही भाग हा अनुवादित पुस्तकांनी व्यापलेला आहे. त्या पुस्तकांतील अनुवादांच्या मूळ भाषांमध्ये हिंदुस्थानी प्रादेशिक भाषा, इंग्लिश, जापनीज, चायनीज, फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश, पोर्तुगीज वगैरे अशा विविध भाषा आहेत. असे असले तरी वर्गवारी नाही, स्वतंत्र विभाग नाही. एखाद्या भव्य जत्रेतील दुकानांसारखी सरमिसळ रांगासारखी ती माझ्या शेल्फमध्ये पसरलेली आहेत. मी तीन भाषांना ओळखतो. त्यातील मराठी माझी जिवलग दोस्तासारखी आहे. हिंदी रस्त्यावरून येता-जाता कुण्या माणसाने भुवया उडवणाऱया ओळखीसारखी आहे, तर तिसरी इंग्रजी वेगवेगळ्या भाषांच्या उंबरठय़ांचं नातं माझ्या तळपायांशी जोडू माझ्या वाचनानुभवाचा पाया भक्कम करणारी आहे. कोणतेही अनुवादित पुस्तक शेल्फमधून काढण्याआधी माझ्या विचारांचे त्या पुस्तकाबद्दल वाचण्याआधीचे चढउतार कसे असतात ते सांगतो.
सगळ्याच पुस्तकांवर धुळीचा अंश सारखाच नसला तरी धुळीच्या स्वभावाचा प्रभाव सारखाच असतो. धुळीत बोटांचे ठसे ठळक दिसोत किंवा अस्पष्ट, पण त्यामुळे एखाद्या पुस्तकप्रेमीची स्पर्श करण्याची पद्धत बदलत नसत. बुक शेल्फसमोर उभे राहून जेव्हा मी जाणुनबुजून एखादे अनुवादित पुस्तक निवडत असतो तेव्हा स्पर्श न बदलण्याची उलट तपासणी मी या धुळीच्या रूपकाच्या हिशोबाने स्वतःवर लादतो . पहिल्या किंवा दुसऱया भाषेतून वळणावळणाने आलेली कोणतीही साहित्यकृती थेट ‘वाचल्याशी उपाय’ म्हणून पाहत नाही. बायडिंगचा कोपरा असू दे किंवा क्रेझी डोअर. ‘कोणतेही पुस्तक ज्या बाजूने वाचण्यासाठी उघडले जाते त्या भागाला मी क्रेझी डोअर म्हणतो.’ समूळ अस्तित्वाच्या विचारांनी पुस्तकांच्या एकूण एक भागाला निरखता आले पाहिजे . हे निरखणं जमलं तर वाचन प्रक्रियेआधी वाचन प्रयोजनाच्या मूळ केंद्राकडे स्वतःला घेऊन जाता येतं.
माझ्यासाठी अनुवादित पुस्तकं म्हणजे बारमाही वाहणाऱया नेणिवेच्या नदीकाठची झरा आटलेली विहीर. विहीर खोल, अरुंद आणि नागमोडी पायऱ्यांची. अशा वेळी विहिरीच्या तळाकडे पाहत निराश व्हायचं नाही. बाजूच्याच नदीत डुबकी मारायची आणि विहिरीत उतरून स्वतःला निथळवत राहायचं. स्वतःला निथळवत राहणं म्हणजे त्या झऱयाच्या आटलेपणाला डिकोड सजीव करणे. अनुवादित पुस्तकाला सामोरे जाताना हातामध्ये असलेल्या पुस्तकाच्या मूळ भाषेतील मुखपृष्ठाची, पुस्तकाच्या मांडणीची, प्रकाशकांची उगाचच आठवण येते. अशा वेळी दुरुस्त करून मूळ संदर्भ शोधण्याचे प्रयत्न करतो. ज्या भाषेची लिपी वाचता येत नाही त्या लेखकाची कोणतीही Fiction साहित्यकृती वाचण्याआधी त्या लेखकाचा भोवताल समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण लेखकाची लेखनप्रक्रियेची उठाठेव त्या त्या संबंधित भोवतालातूनच घडत असते. त्यासाठी लेखकाचा पत्रव्यवहार, मुलाखती, इतर सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक मतं समजून घेणं महत्त्वाचं आहे. यातून लेखकाची भूमिका कळते. लेखकाच्या वैयक्तिक आणि सामाजिक भूमिका कळणं ही वाचकाची प्राथमिक गरज असते जेव्हा तो दोन ते तीन भाषा ओलांडून लेखकाची साहित्यकृती समजून घेत असतो. प्रत्येक भाषेचा उगम, त्या भाषेची लिपी, त्या भाषेचे व्याकरण, त्या भाषेचा जागतिक व्यवहार, त्या भाषेतील संक्रमण, त्या भाषेतील संकरितपण हे एखाद्या असामान्य वाचकालाही प्रयत्न करून समान रेषेत स्वीकारता येत नाही. त्यामुळे कुठल्याही भाषेच्या व्यापकतेच्या घराचं दार ठोठावणं अशक्य होऊ लागतं तेव्हा त्या भाषेच्या घराच्या खिडकीतून आपल्या आकलनाचा कोपरा समजून घेता येतो.
प्रत्येक वाचकाला अनुवादित पुस्तकांच्या दरम्यान अनुवादाच्या भाषाशास्त्राचे ज्ञान नसतं . त्यामुळे अनुवादित पुस्तक हातात घेताना मूळ भाषा वाचता आली असती तर? या प्रश्नाला स्वीकारताना आपण अनुवादित पुस्तकांकडे आणि अनुवादकाडे कुठल्या गरजेने बघतो ते महत्त्वाचे आहे. एखाद्या प्रचंड प्रसिद्ध असलेल्या पुस्तकाचा मातृभाषेतला अनुवाद वाचल्यावर अनुवादकाच्या अस्तित्वाचा मी विचार करतो. अशा वेळी अभिजात साहित्याला स्वभाषेत आणताना अनुवादकाची मानसशास्त्राrय परिभाषा जवळून पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लेखनाच्या चित्रविचित्र शैलींशी परिचित असणं व विविध भाषांवर हुकूमत असणे किंवा एक नितळ वेगळ्या भाषेतील अनुभूती हजारो किलोमीटरवरून वाचकाच्या दारात आणणे यामागे अनुवादक कुठली व्यावहारिक आणि स्व भावनिक इच्छा बाळगून असतो याची मिती वाचकाने तंतोतंत गाठायला हवी.






























































