सफारी पार्कमध्ये एन्ड्यूरन्सच्या मदतीने 1 जुलैपासून वृक्षारोपण

मिटमिटा येथील सफारी पार्कच्या (झुऑलॉजिकल पार्क) जागेत महापालिका एन्ड्युरन्स कंपनीच्या मदतीने वृक्षारोपण करणार आहे. एक जुलैपासून वृक्षारोपणाचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महापालिका मिटमिटा भागात ‘स्मार्ट सिटी’ च्या माध्यमातून सफारी पार्कची उभारणी करीत आहे. शंभर एकर क्षेत्रात हे पार्क उभारले जाणार असून त्याचे काम जवळपास ऐंशी टक्के पूर्ण झाले आहे. काम पूर्ण झाल्यावर सिध्दार्थ उद्यानात सध्या असलेले प्राणिसंग्रहालय सफारी पार्कच्या जागेत स्थलांतरित करण्यात येणार आहे. प्राणिसंग्रहालय त्या ठिकाणी स्थलांतरित करण्यापूर्वी सफारी पार्कच्या एकूणच जागेत दाट वृक्षारोपण करावे लागणार आहे. दाट वृक्षारोपण करण्यात आले तरच त्या भागात प्राणिसंग्रहालय स्थलांतरित करणे शक्य होणार आहे. प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना या ठिकाणी मुक्तपणे विहार करता येणार आहे.

वृक्षारोपणासाठी महापालिकेने एन्ड्युरन्स कंपनीबरोबर सामंजस्य करार केला असल्याची माहिती मिळाली आहे. या कंपनीच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्याची जबाबदारी पालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्याकडे दिली आहे. देशी प्रजातींची कोणती झाडे या परिसरात लावता येतील याची यादी महापालिकेकडून एन्ड्युरन्स कंपनीला दिली जाणार असून त्यानंतर एक जुलैपासून प्रत्यक्ष वृक्षारोपणाला सुरुवात केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रशासक जी. श्रीकांत यांनी या बद्दल बैठक घेतली आणि वृक्षारोपणाच्या दृष्टीने तयारी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. काही मोठ्या झाडांचे प्रत्यारोपण देखील केले जाणार आहे. त्यामुळे वृक्षारोपण करण्यात येणाऱ्या काही झाडांमध्ये मोठ्या झाडांचा देखील समावेश असणार आहे.