50 कोटी वृक्षलागवड मोहिमेचा घेतला जाणार आढावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात 2017 पासून 3 वर्षात 50 कोटी वृक्षलागवड करण्याचे निश्‍चित करुन वृक्षलागवड मोहीम राबविण्यात आली होती. वृक्षलागवड मोहिमेदरम्यान वनेतर क्षेत्रात लावलेल्या रोपांपैकी जिवंत रोपे आणि त्यांची वाढ तपासण्यासाठी आता जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या समितीची शुक्रवारी बैठक झाली. यात जिल्ह्यातील विविध यंत्रणांनी लावलेल्या रोपांची सद्यस्थिती तपासली जाणार आहे. प्रत्येक वनेतर यंत्रणांच्या महिन्यातून किमान 2 रोपवनांची तपासणी करणे, दरमहा जिवंत रोपांच्या टक्केवारीचा आढावा घेणे, जिवंत रोपे 80 टक्केपेक्षा कमी राहणार नाही, यासाठी उपाययोजना करणे आदींचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार केला जाणार आहे.

जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, ज्या यंत्रणांनी वृक्षलागवड केली आहे. त्यांनी त्या रोपांना जगवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून वृक्षलागवडीनंतर किती रोपे जगली याची तपासणी सुरु होईल, तसेच रोपवाढीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असेल तर तसे करावे लागेल. यंत्रणानिहाय उत्तम कामगिरी केलेल्या यशस्वी रोपवनांची निवड करुन तशा यंत्रणांना आणि संबंधित समन्वय अधिकारी यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वृक्षलागवड मोहिमेच्या पहिल्या वर्षी राज्यात 4 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट्य होते. 2018 रोजी 13 कोटी आणि 2019 च्या पावसाळ्यात 33 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले होते. राज्यात या उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षलागवड झाली होती. आता त्यातील जिवंत रोपे आणि समाधानकारक वाढ तपासली जाणार आहे. या बैठकीला उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, सदस्य सचिव विभागीय वनाधिकारी कीर्ति जमदाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश राऊत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.