
सामना ऑनलाईन । अमरावती
अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील साद्रावाडी गावाला बुधवारी पहाटे 2 च्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के बसले. पहाटे 2 वाजण्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत एकामागून एक असे सात धक्के बसल्याची माहिती स्थानिकांनी दिली. भूकंपाच्या धक्यांनी अनेक घरातील भांडी आणि सामान पडले. काही घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पहाटेच्या वेळी घडलेल्या घटनेनंतर भीतीपोटी नागरिक घराबाहेर मोकळ्या परिसरात येऊन उभे राहिले होते. या आधी गेल्या आठवड्यातील शुक्रवारी देखील येथे भूकंपाचे सौम्य धक्के साद्रावाडी गावाला बसले होते. त्यावेळी कोणतेही नुकसान झाले नव्हते.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने भूकंपाचे धक्के बसल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. लवकरच प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे.




























































