
>> अभिनय देव, दिग्दर्शक
इरफान खान… इंडस्ट्रीतील असा कलाकार ज्याच्याबद्दल जितकं बोलू तितकं कमीच. आमचं प्रोफेशनल रिलेशन तर होतंच, पण ‘ब्लॅकमेल’ सिनेमाच्या वेळी आमची चांगली मैत्री झाली. हे नातं पुढे नेणारी गोष्ट म्हणजे त्याचा मुलगा बाबूल आणि माझा मुलगा युग. आमची मुलं एका शाळेत जातात. बाबुलला माझ्या मुलाच्या शाळेत घालण्याचं कारणही मीच. मीच तसं इरफानला सुचवलं. त्यामुळे आमचं नातं अधिक घट्ट होत गेलं.
इरफान म्हणजे खूप मजेशीर व्यक्तिमत्व, त्याचवेळी तत्ववादी आणि तितकाच उत्स्फूर्त. केवळ बॉलिवूडवरच नव्हे तर जगाच्या सिनेमावर त्याने आपला ठसा उमटवला. इंडस्ट्रीची कोणतीही पार्श्वभूमी नसतात केवळ आणि केवळ अभिनयाच्या ताकदीवर तो इतका वर आला. ज्यावेळी तो हॉलिवूडमध्ये चमकायला सुरुवात झाली त्याचवेळी त्याच्या आजाराची दुर्देवी बातमी आली. आता खरं तर त्याचा टाईम सुरू झाला होता. आम्ही ‘ब्लॅकमेल’ सिनेमा करत असताना त्याचे हॉलिवूड सिनेमा आले. अमेरिका, कोरियासाठी त्याने काम केलं. जागतिक सिनेमा माझ्या आवडीचा विषय आहे. जागतिक सिनेमात माझाही सहभाग असतो. त्यामुळे माझं आणि इरफानचं या विषयावर बोलणं सुरूच राहायचं.
इरफानच्या अभिनयाच्या बलस्थानाबद्दल एवढंच सांगेन की, त्याला कधी रिहर्सल करायला आवडायची नाही. कारण त्याला त्याची उत्स्फूर्तता घालवायची नसायची, पण त्याचवेळी स्वत:च्या कॅरेक्टरचा इतिहास, त्याचा भूगोल, त्याचा आत्मा या साऱयांचा इरफानचा अभ्यास पक्का असायचा. कथेचं वजन काय, दृश्याचं वजन काय अशा पातळीवर जाऊन तो अभ्यास करायचा. आपल्या इंडस्ट्रीत असे कितीतरी कलाकार आहेत ते त्या पातळीपर्यंत पोचण्याचा विचारही करू शकत नाहीत. त्याची भूमिका कुठला तरी संदेश देणारी असेल किंवा नर्मविनोदी शैली असेल, इरफान इतक्या सहजपणे काम करायचा की त्याला रिहर्सलची कधी गरजच लागली नाहीत. याला कारण म्हणजे त्याची सुंदर विचारसरणी! त्याचबरोबर अभिनयावरचा त्याचा होल्ड. कोणत्याही प्रकारच्या भावना अगदी डोळ्यांतून, देहबोलीच्या बारकाव्यातून काहीही न बोलता तो व्यक्त करायचा. त्यातून प्रेक्षकांना अविस्मरणीय अभिनयाची पर्वणी मिळायची. केवळ अभिनयाबद्दल नव्हे तर जीवनाबद्दलही त्याचा दृष्टीकोन असाच होता. ‘ब्लॅकमेल’च्या वेळी भरपूर इमोशन्सने भरलेला शॉट्स देताना मला तो म्हणाला होता, ‘दिग्दर्शक म्हणून तुला जे पाहिजे, ते मी कलाकार म्हणून देऊ शकलो नाही तर उद्यापासून मी पिक्चरमध्ये काम करणे सोडून दिलं पाहिजे.’
सुपरस्टारच्या स्पर्धेत न धावताही इरफान सुपरस्टार ठरला. तो कधीही स्टारडमच्या मागे पळाला नाही. प्रत्येकवेळी त्याला स्वत:ला काहीतरी नवीन करायचं असायचं. प्रत्येक सिनेमात नवीन द्यायचं हे त्यानं ठरवलेलं असायचं. आयुष्यात आपण कोणतंही ध्येय ठरवलं तर ते ध्येय आपल्या आयुष्याची व्याख्याच बदलून टाकतं. जेव्हा फक्त पैसा किंवा स्टारडमच्या मागे लागतो, तेव्हा मग तडजोडी आपसूकच येतात. इरफानने अभिनयाची उत्तुंगता हे ध्येय ठेवलं होतं. म्हणूनच तो कलाकार म्हणून मोठा होता आणि माणूस म्हणूनही… इरफानसोबत आणखी काम करायचं होतं. सध्या मी त्याच स्क्रिप्टवर काम करतोय. जर सगळं मनाप्रमाणे झालं असतं तर वेगळं कॉम्बिनेशन बघायला मिळालं असतं. दुर्देवाने ते झालं नाही. स्वप्नंच राहीलं.



























































