अनेक मान्यवरांची स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

त्यांचे गाणे अमर राहील

लताजींसारखा कलाकार शतकांतून एकदा जन्माला येतो. लता दीदी या उत्तम व्यक्ती होत्या. त्यांचा स्वर्गीय आवाज आता कायमचा शांत झाला आहे. पण त्यांचे गाणे अमर राहील. माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आणि चाहत्यांसोबत आहेत.
– रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

संगीतसाधकांसाठी सदैव प्रेरणादायी

देशाची शान, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. संगीताची साधना करणाऱयांसाठी त्या सदैव प्रेरणा राहिल्या. लता दीदींचा स्वभाव अतिशय शांत होता. संपूर्ण देशवासीयांप्रमाणे मलाही त्यांचे संगीत आवडायचे. मला जेव्हाही वेळ मिळायचा, तेव्हा मी त्यांची गाणी ऐकायचो. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
– नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री

संगीत विश्वाला पडलेलं स्वप्न भंगलं

‘अजीब दास्ताँ है ये…. कहाँ शुरू कहाँ खतम्, ये मंजिलें हैं कौनसी…? ना वो समझ सके, ना हम…’ सारख्या हजारो सुरमधुर गाण्यांनी कोटय़वधी रसिकांच्या हृदयसिंहासनावर आठ दशकांहून अधिक काळ अधिराज्य करणाऱया स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे हिंदुस्थानीच नव्हे तर, जागतिक संगीत विश्वाला पडलेलं अद्भुत स्वप्न होतं. लतादीदींच्या निधनानं ते स्वप्न आज भंगलं आहे. संगीत विश्वातला स्वर्गीय सूर हरपला आहे. रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णसेवेच्या क्षेत्रातलं त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील.
– अजित पवार,उपमुख्यमंत्री

संगीत विश्वातील देव्हारा रिकामा झाला

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्वरात ईश्वराला जागवण्याची व तान्हुल्यांना निजवण्याची जादू  होती.  लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत विश्वातील देव्हारा रिकामा झाला आहे. त्यांचा दैवी स्वरदीप मात्र मनामनात तेवतच राहील. भारतरत्न लता मंगेशकर यांचे संगीत देश, भाषा व काळ यांच्या सीमा उल्लंघून थेट अंतरात्म्याला जागवणारे होते. आपल्या भावगीतांनी ईश्वराला जागविण्याची, प्रेमगीतांनी तरुणाईला खुलवण्याची, देशभक्तीपर गीतांनी जवानांना स्फुरण देण्याची तर प्रेमळ अंगाई गीतांनी तान्हुल्यांना निजविण्याची अद्भुत जादू त्यांच्या स्वरात होती.
– भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

अलौकिक स्वर हरपले

जगभरातील कोटय़वधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

त्यांचा जादुई आवाज अमर आहे

जादुई आवाज म्हणून लताजींच्या आवाजावर लोक मनापासून प्रेम करतात. त्यांचा जादुई आवाज अमर आहे, चिरंतन आहे आणि या पुढेही तो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहील. मी त्यांच्या कुटुंब, मित्रमैत्रिणी आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे.
– राहुल गांधी, काँग्रेस नेते