
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत आदरांजली वाहण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी दादांची कार्यशैली, लोकहिताच्या कामांप्रति असलेली त्यांची तळमळ आणि दिलदार स्वभावाच्या आठवणींना उजाळा दिला. विविध नेत्यांनी सांगितलेल्या व्यक्तिगत आठवणींनी सगळेच गहिवरले. ‘अजितदादा त्यांच्या कामामुळे कायम महाराष्ट्राच्या स्मरणात राहतील,’ अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.
विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव मांडला. ‘अजितदादांची निर्णय क्षमता आणि प्रशासनावरील पकड यांचा विचार केला तर मुख्यमंत्री पदासाठी आवश्यक असलेले सर्व गुण त्यांच्यामध्ये होते. राज्याला एक चांगला मुख्यमंत्री मिळू शकला असता, पण ते झाले नाही. मात्र, अजित पवार हे महाराष्ट्राला न मिळालेले सर्वोत्तम मुख्यमंत्री होते, असे फडणवीस म्हणाले.
प्रत्येकाच्या मनात संशय – भास्कर जाधव
शिवसेनेचे सदस्य भास्कर जाधव यांनी अजित पवार यांच्या अपघाताबद्दल संशय व्यक्त केला. ‘अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला हे मानायला सर्वसामान्य माणसाचे मन तयार होत नाही. हा अपघात नसून घातपातच आहे, असा दाट संशय राज्यातील प्रत्येकाच्या मनात आहे. यामागचे सत्य मुख्यमंत्र्यांनी शोधून काढावे,’ अशी विनंती भास्कर जाधव यांनी यावेळी केली.
रोहित पवार यांना अश्रू अनावर
रोहित पवार यांनी भाषण करताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ‘काका म्हणून अजित पवार यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी सांगितल्या. अजितदादांवरील आरोप कधीच सिद्ध झाले नाहीत. ते आरोप निराधार किंवा राजकीय भाषणाचा भाग असू शकतात. त्यामुळे हे आरोप पुसून टाकायला हवेत. हे सगळे आरोप एका गाठोडय़ात भरून समुद्रात फेकून दिले तर ती दादांना खरी आदरांजली असेल,’ असे आवाहन रोहित पवार यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केले.
महाराष्ट्राचा दादा माणूस – सुनील प्रभू
शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी यावेळी अजित पवारांच्या स्पष्टवत्तेपणाची वैशिष्टय़े सांगितली. ‘अजित पवार हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे ‘दादा माणूस’ होते. त्यांच्या विमानाचा अपघात कसा झाला याचा तपास संबंधित यंत्रणा करतील. पण उभ्या महाराष्ट्राला त्यांच्या निधनाबद्दल संशय आहे. अपघाताची कसून चौकशी करावी आणि सत्य समोर आणावे,’ असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मंत्री आदिती तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, आशीष शेलार, सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम यांच्यासह अन्य सदस्यांची भाषणे झाली.































































