आळंदीत प्रस्थान काळात तिहेरी पोलीस बंदोबस्त; भाविक, नागरिकांच्या आरोग्य सुरक्षिततेला प्राधान्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी यात्रा पालखी सोहळ्यास आळंदीसह पंचक्रोशीतून आळंदीस जोडणाऱ्या रस्त्यांवर तिहेरी बंदोबस्त तैनात करण्यात येत असून भाविक, नागरिकांनी आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीने कोरोंना महामारीच्या संकट काळात अनावश्यक बाहेर फिरू नये तसेच अत्यावश्यक गरजेच्या वेळी स्वत: बरोबर स्थानिक ओळखपत्र जवळ बाळगण्याचे आवाहन आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी केले आहे.

आळंदी माऊली पालखी सोहाळ्यांतर्गत श्रींचे चल पादुकांचे प्रतिकात्मक प्रस्थान ठराविक मोजक्याच वारकरी भाविकांचे उपस्थितीत येत्या 2 जुलैला आळंदी मंदिरातून सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हरिनाम गजरात होणार आहे. यावर्षीही सोहळ्यावर कोरोंना महामारीचे सावट असल्याने सोमवार (दि.28) पासून 4 जुलैपर्यंत आळंदीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वारकरी भाविकांची प्रस्थानाला गर्दी होऊ नये तसेच कोरोंनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सोहळ्याच्या काळात आळंदीत कडक बंदोबस्त ठेवत नागरिक, भाविक,वारकरी यांचे आरोग्य सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात येत आहे. यासाठी पोलिसांची मोठी फौज सुरक्षिततेस उभी राहणार आहे.

यामध्ये बंदोबस्तात 50 पोलीस अधिकारी, 210 पोलीस अंमलदार, 90 होमगार्ड, 2 एसआरपीएफच्या तुकड्या, बॉम्ब शोधक व नाशक पथक, घातपात विरोधी पथक तैनात करण्यात येत आहे. बंदोबस्तासाठी मंदिर व परिसरास प्राधान्य देण्यात आले असून मंदिरात व मंदिराबाहेर अशा तीन टप्यात नाकाबंदी व बेरिकेटिंग केली जाणार आहे. यात मंदिरालगत, प्रदक्षिणा मार्ग आणि आळंदी शहराबाहेर असा तिहेरी बंदोबस्त लावण्यात येत आहे.

आळंदी शहरातील कर्मचारी, स्थानिक नागरिक यांनी आपले आधारकार्ड अगर एखादे ओळख पटवून देणारे कागदपत्रे जवळ बाळगून अत्यावश्यक कामास बाहेर जाता येईल. मात्र, विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन आळंदी पोलिसांनी केले आहे. आळंदीत बंदोबस्ताची तयारी सुरू करण्यात आली आहे. आळंदी पोलीस ठाणे, आळंदी नगरपरिषद, आळंदी देवस्थानमध्ये प्रस्थानाची तयारी सुरू करण्यात आली असून यावर्षी कोरोंना महामारीमुळे भाविक,वारकरी व स्थानिक नागरिकांचे आरोग्य सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात आले आहे.