
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे शिर्डी – हैदराबाद राज्य महामार्गावर कडब्याने भरलेल्या ट्रकने अचानक पेट घेतल्याने, संपूर्ण कडबा जळून खाक झाला असून, ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, मालट्रक चालकाने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या मैदानात नेल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
खर्डा येथील वडारवस्ती जवळून जाणाऱया रस्त्यावरून कडबा वाहतूक करणाऱया हनुमंत नागरे (रा. सुपा, ता. पारनेर) यांच्या मालट्रकमध्ये अंतर्गत शॉर्टसर्किट होऊन कडब्याने भरलेल्या ट्रकने अचानक पेट घेतला. परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केला असता, आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. ट्रकचालकाने अशाही परिस्थितीत मालट्रक मोकळ्या मैदानात नेल्याने मोठा अनर्थ टळला. या वेळी शेजारीच असलेल्या अनिल सुरवसे, संतोष लष्करे व राजकुमार आजबे यांनी आपल्या घरातील पाण्याचे बोअर चालू करून आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात येण्यास वेळ गेला. तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.
परिसरातील नागेश रणभोर, विकास डोके, इरफान शेख, घनश्याम भोसले, रमेश मदने, नितीन आहेर, नीलेश आहेर, रतन डोके, राजकुमार तेवर, प्रवीण धोत्रे, काळू पवार, विकास डोके यांच्यासह शहरातील तरुणांनी शेजारी पडलेल्या बांधकामाचे लाकडे उचलून गाडीतील कडबा जमिनीवर ढकलण्याचा प्रयत्न केला. हा ट्रक शिर्डी-हैदराबाद राज्य महामार्गावर पेटल्यामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प होती.

























































