
भरधाव अवजड ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील हडपसर परिसरात घडली. याप्रकरणी ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे. अरविंद रामचंद्र देशपांडे (वय 53, रा. साईश्रद्धा पार्क, गोपाळपट्टी, मांजरी) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालक कैलास उत्तम राठोड (वय 30, रा. घागरा, ता. जिंतूर, जि. परभणी) याला अटक करण्यात आली आहे. देवेंद्र अरविंद देशपांडे (वय 23) याने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दुचाकीस्वार अरविंद पुणे-सोलापूर रस्त्यावरुन निघाले होते. त्यावेळी हडपसर भागात अवजड ट्रकने अरविंद यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या अरविंद यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात अधिक तपास करत आहेत.

































































