
हिंदुस्थानावर 25 टक्क्यांपर्यंत टॅरिफ हल्ल्यानंतर, आता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया आली आहे. ट्रम्प यांनी मोठे विधान केले आहे. हिंदुस्थान आणि रशियामधील मजबूत संबंध पाहून ट्रम्प इतके संतापले आहेत की, दोन्ही देशांवर आपला राग व्यक्त केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, हिंदुस्थान रशियासोबत काय करतो याची मला पर्वा नाही. रशियासोबत हिंदुस्थान करत असलेल्या व्यवहारांची पर्वा नाही. ते त्यांची मृत अर्थव्यवस्थेसह बुडाले तरी मला पर्वा नाही.
ट्रम्प केवळ इतकेच बोलून थांबले नाहीत. तर त्यांनी, रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांच्यावरही सडकुन टीका केली. ट्रम्प म्हणाले, रशियाचे अपयशी माजी राष्ट्राध्यक्ष मेदवेदेव, अजूनही स्वतःला राष्ट्रपती मानतात, त्यांना सांगा त्यांनी त्यांच्या शब्दांवर लक्ष ठेवावे. मेदवेदेव यांनी अमेरिकेला इशारा दिला होता की, वॉशिंग्टन डीसीने रशियासोबतचा अल्टिमेटम गेम युद्धाला कारणीभूत ठरेल. यावरही ट्रम्प यांनी म्हटले की, रशियाचे अपयशी माजी राष्ट्राध्यक्ष मेदवेदेव, अजूनही स्वतःला राष्ट्रपती समजतात. त्यांना सांगा की त्यांनी त्यांच्या शब्दांवर लक्ष ठेवावे. ते एका अतिशय धोकादायक क्षेत्रात प्रवेश करत आहेत.
ट्रम्प यांनी बुधवारी 1 ऑगस्टपासून हिंदुस्थानातून येणाऱ्या सर्व वस्तूंवर 25 टक्के शुल्क आकारण्याची घोषणा केली. अगदी काही दिवसांपूर्वीच हिंदुस्थानने रशियाकडून एस-400 हवाई संरक्षण प्रणाली त्याचबरोबरीने कच्चे तेल आणि इतर धोरणात्मक संसाधने आयात करणे सुरूच ठेवले आहे.