
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा व्हिडीओ जारी केला असून हिंदुस्थानी वंशाच्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या अहमदाबादमधील भाषणाची काही दृश्य त्या व्हिडीओमध्ये आहे. या व्हिडीओद्वारे अमेरिकेत राहणाऱ्या 20 लाख हिंदुस्थानी वंशाच्या मतदारांना आकर्षित करण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारी महिन्यात हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी आणि पंतप्रधान मोदी यांनी अहमदाबादमध्ये जनतेला संबोधित केले होते.
अमेरिकेचे हिंदुस्थानसोबत मैत्रीचे दृढ संबंध आहेत. आमच्या पक्षाला आणि प्रचाराला हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेशी संबंधित असणाऱ्या किंबरले गुइफोयले यांनी सांगितले. प्रचार मोहिमेचे नेतृत्व ट्रम्प यांचा मुलगा ज्युनिअर ट्रम्प करत आहे. त्यांचे हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकी नागरिकांशी चांगले संबंध आहेत. या व्हिडीओत ट्रम्प आणि मोदी यांची मैत्री आणि दोन्ही देशांतील दृढ संबंध दाखवण्यात आले आहेत.
हा प्रचाराचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ‘फोर मोर ईयर्स’ नावाचा हा 107 सेकंदांचा व्हिडीओ पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या फूटेजने सुरू होतो. मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना ह्यूस्टनच्या स्टेडियमकडे जाताना ट्रम्प यांचा हात हातात घेतला आहे. त्या दृश्याने व्हिडीओ सुरू होतो. त्यावेळी मोदी यांनी ह्यूस्टनमध्ये केलेले भाषण गाजले होते. अमेरिकेत मोदी यांच्या भाषणाची चर्चा होती. अमेरिकेत मोदी लोकप्रिय आहेत. त्यामुळे हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकी नागरिकांना आकर्षित करण्यासाठी ट्रम्प यांनी हा व्हिडीओ जारी केल्याचे सांगण्यात आले आहे.

























































