
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यूकेच्या दौऱ्यावर आले होते. लंडनहून निघताना डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड झाला. तातडीने हेलिकॉप्टर दुसऱ्या ठिकाणी उतरवून दोघांनाही दुसऱ्या हेलिकॉप्टरने पुढे प्रवास करावा लागला.
व्हाइट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यूके दौरा संपवून परत निघत होते. तेव्हा त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ‘हायड्रॉलिक’चा एक छोटा बिघाड झाला. खबरदारी म्हणून, वैमानिकांनी हेलिकॉप्टरला स्टॅनस्टेड विमानतळाऐवजी जवळच्या एका मैदानावर उतरवलं. यामुळे ट्रम्प आणि मेलानिया यांना दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये बसून पुढे जावं लागलं.
या घटनेमुळे स्टॅनस्टेड विमानतळावर पोहोचायला त्यांना थोडा उशीर झाला. व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लीव्हिट यांनी या घटनेची माहिती दिली.
ट्रम्प यांचा यूके दौरा नुकताच संपला असून या दौऱ्यात त्यांनी यूकेचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली होती.