अमेरिकेचा इराणवर हल्ल्याचा कट, अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांना दिली पूर्ण माहिती

इराणमधील नागरिक सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून इराणमध्ये आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर सरकारकडून गोळीबार करण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आंदोलनात उडी घेतली आणि थेट इराणने आंदोलकांवर अत्याचार केला तर आम्ही त्यांना प्रचंड यातना देऊ असे थेट अमेरिकेने म्हटल्याने खळबळ उडाली. एवढेच नव्हे अमेरिकन अधिकाऱ्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणवरील संभाव्य लष्करी हल्ल्यांच्या पर्यायांबद्दल माहिती दिली आहे. मात्र ट्रम्प यांनी अद्याप निर्णय घेतलेला नसल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  

ट्रम्प यांनी शनिवारी सोशल मीडियावर लिहिले, ‘इराण स्वातंत्र्याकडे पाहत आहे, जे यापूर्वी कधीही घडले नाही. अमेरिका मदतीसाठी तयार आहे.’ तर, इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर कालिबाफ यांनी रविवारी इशारा दिला की, जर अमेरिका किंवा इस्रायलने इराणवर हल्ला केला, तर दोघांनाही कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. जे लोक निदर्शनांमध्ये सहभागी होतील किंवा त्यांना मदत करतील त्यांना शत्रू मानले जाईल आणि मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल, असा इशारा इराणच्या
ऍटर्नी जनरलने दिला. इराणवर अमेरिकेच्या हल्ल्याच्या शक्यतेमुळे इस्रायल हाय अलर्टवर आहे. परिस्थिती पाहता इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी सतर्कता वाढवली आहे.

217 लोकांचा मृत्यू

इराणमध्ये किमान 217 निदर्शकांचा मृत्यू झाल्याचे समजते. आतापर्यंत 2600 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.

इराणची अमेरिका आणि इस्रायलला धमकी

इराणने अमेरिकेच्या संभाव्य लष्करी कारवाईवर तीव्र इशारा दिला आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर कलिबाफ यांनी म्हटले आहे की, जर आंदोलकांवरून अमेरिकेने इराणवर हल्ला केला, तर अमेरिकन सैन्य आणि इस्रायल दोन्ही इराणच्या निशाण्यावर असतील.