रुपया रसातळाला, नव्वदीकडे वाटचाल; ट्रम्प यांच्या टॅरिफचा तडाखा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ लावल्याचा जबरदस्त फटका हिंदुस्थानला बसत आहे. टॅरिफमुळे होत असलेला तोटा आणि शेअर्समधून विदेशी गुंतवणूकदार आपले पैसे काढून घेत असल्यामुळे हिंदुस्थानी रुपया प्रचंड प्रमाणात घसरत असून रसातळाकडे जात आहे. आयात केल्या जाणाऱया वस्तू आणखी महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिंदुस्थानी रुपये अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 88 रुपयांच्या वर गेला असून त्याने नव्वदीकडे वाटचाल केली आहे. शुक्रवारी हिंदुस्थानी रुपयांमध्ये डॉलरच्या तुलनेत 64 पैशांची घसरण झाली असून 88.29 रुपये प्रति डॉलरवर पोहोचला. रुपयाने आतापर्यंतचा सर्वात खालचा तळ गाठला आहे. 2025 मध्ये आतापर्यंत रुपया 3 टक्क्यांनी घसरला आहे. 2025 मध्ये हिंदुस्थानी रुपया आशियातील सर्वात खराब कामगिरी करणारे चलन ठरले आहे. चिनी युआनच्या तुलनेत रुपयाची घसरगुंडी सुरूच आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे हिंदुस्थानी उत्पादनांना प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.

ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे हिंदुस्थानच्या जीडीपी ग्रोथमध्ये 0.6 ते 0.8 टक्के घसरण येऊ शकते. भारतीय रिझर्व्ह बँकेने 31 मार्चपर्यंत 6.5 टक्के ग्रोथ रेटचा अंदाज लावला आहे. टॅरिफमुळे टेक्सटाईल आणि ज्वेलरीसारख्या सेक्टरमध्ये मंदी येऊन लाखो नोकऱयांवर गंडांतर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेतून हिंदुस्थानात निर्यात केल्या जाणाऱया वस्तूंमध्ये कच्चे तेल, पेट्रोलियम, कोळसा, हिरे, विमान, अंतराळसाठीचे साहित्य याचा समावेश आहे. तर हिंदुस्थानातून अमेरिकेत केल्या जाणाऱया निर्यातीत फार्मास्युटिकल्स, टेलिकॉम डिव्हाईस, ज्वेलरी, पेट्रोलियम, रेडिमेड कपडे यांचा समावेश आहे.

7.59 लाख कोटींची अमेरिकेला निर्यात

  • मशीनरी 1.68 लाख कोटी
  • इलेक्ट्रॉनिक्स 1.28 लाख कोटी
  • ड्रग्स आणि फार्मा 0.92 लाख कोटी
  • रत्न आणि ज्वेलरी 0.87 लाख कोटी
  • रेडिमेड गार्मेंट्स 0.82 लाख कोटी
  • केमिकल्स 0.37 लाख कोटी
  • पेट्रोलियम प्रोडक्ट्स 0.36 लाख कोटी
  • अन्य प्रोड्क्ट्स 1.29 लाख कोटी