
>> श्रीरंग काटेकर
देशांतर्गत व जागतिक स्तरावर क्षयरोगाचा वाढता फैलाव हे वैद्यकीय सेवा क्षेत्रापुढील एक मोठे आव्हान आहे. याबाबत सर्वच देशांतील वैद्यकीय क्षेत्रातील संशोधक नावीन्यपूर्ण संशोधन करण्यामध्ये व्यस्त आहेत. अद्याप या संसर्गजन्य आजारावर प्रभावी व परिणामकारक औषधांची निर्मिती न झाल्याने या आजाराने त्रस्त असणारे असंख्य रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे ही एक गंभीर राष्ट्रीय समस्या झाली आहे. क्षयरोगासारख्या दुर्धर आजारावर मात करण्याचा संकल्प 7 एप्रिल या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने सर्वांनी करू या.
क्षयरोग म्हणजेच टीबी हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्णांची संख्या वाढत राहते. याबाबत जनजागृती, प्रबोधनाबरोबरच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. या आजाराचा प्रसार पाहता राज्य व केंद्र सरकारने गांभीर्याने याकडे लक्ष देत धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत. ज्यामुळे क्षयरोग झालेल्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
कोरोना महामारीच्या संकटाशी मुकाबला करताना जगभरातील असंख्य नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्याचप्रमाणे क्षयरोग या आजाराने लाखो लोक दरवर्षी मृत्युमुखी पडतात. या आजाराची व्याप्ती पाहता कोरोना महामारी संकटाप्रमाणेच हा आजार भयानक असल्याचे दिसून येते. जगभरात जवळपास एक कोटीहून अधिक क्षयरुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी जवळपास 12 लाख नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. दुर्दैवाने यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे हिंदुस्थानात आढळून आले आहेत.
क्षयरोग हा कोरोना, कॅन्सर व अन्य दुर्धर आजारांपेक्षाही भयानक स्वरूपाचा आजार असून तो मानवी जीवनासाठी सर्वात घातक ठरत आहे. देशात या आजाराचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामध्ये प्रामुख्याने रुग्णांचे लक्षणांकडे होत असलेले दुर्लक्ष तसेच प्रदूषित हवामान याचाही परिणाम हा मानवाच्या शरीरावर होत असतो.
या आजारावर मात करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी प्रोटिनयुक्त आहार हा प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. तसेच सकस आहाराचा अवलंब जीवनात करून रोगप्रतिकारशक्ती वाढवणे यावर भर दिला पाहिजे. स्पर्धेच्या युगात करीअरसाठी जो तो धावत सुटला आहे. त्याचे दुष्परिणामही शरीरावर होत आहेत. परिणामी अनेक जण विविध आजारांचे ते शिकार बनत आहेत. आहारामध्ये दूध, दही, अंडी, पालेभाज्या यांसह मासे व कडधान्ये यांचा वापर होणे आवश्यक आहे. अन्न, वस्त्र, निवारा याबरोबर निरोगी आरोग्य ही आजच्या काळाची खरी गरज आहे. यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल घडवणे गरजेचे आहे. यासाठी नियमित व्यायामाबरोबर संतुलित आहार याबाबत जागरूक राहिले पाहिजे तरच अशा संसर्गजन्य आजारावर आपण मात करू शकू. बदलत्या जीवनशैलीचे दुष्परिणाम हे शरीरावर घडत असतात. अनियमित आहार, ताणतणाव, अपुरी झोप, त्याचप्रमाणे प्रदूषित हवामानामुळे विविध आजार शरीरात निर्माण होतात. 21 वे शतक हे स्पर्धेचे युग असले तरी प्रत्येकाने आपल्या निरोगी आरोग्याबाबत जागरूक राहिले पाहिजे. निरोगी आरोग्य व आनंददायी जीवनशैली यांचा स्वीकार आजच्या काळाची खरी गरज आहे. यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवू या.
क्षयरोग रोखण्यासाठी लोकसहभागाची गरज
क्षयरोग राष्ट्राच्या प्रगतीमधील अडथळा ठरत आहे. या आजाराने मोठ्या प्रमाणात होणारी मनुष्यहानी पाहता ती एक राष्ट्रीय समस्या झाली आहे. मागील तीन वर्षांत क्षयरोगाचे जवळपास 7 लाख 20 हजार रुग्ण आढळून आले आहेत. शहरी व ग्रामीण भागातही याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. मायक्रोबॅक्टेरियम टय़ुबरक्युलोसिस या जिवाणूमुळे होणारा हा संसर्गजन्य आजार आहे. या आजारावर मात करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून त्यासाठी आपापल्या भागात आढळणाऱ्या क्षयरुग्णांची माहिती तातडीने संबंधित विभागाला देणे गरजेचे आहे. क्षयरोग निर्मूलनासाठी आता व्यापक चळवळ उभी राहणे आवश्यक आहे.






























































