कल्याणकरांचा मंगळवार कोरडवार ठरणार; बारावे, मोहिली उदंचन केंद्राची दुरुस्ती होणार,नऊ तास पाणीपुरवठा बंद

बारावे आणि मोहिली येथील उदंचन केंद्राच्या यांत्रिक मार्गिकेतील गाळ काढण्याच्या कामासाठी कल्याणमध्ये उद्या मंगळवारी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत नऊ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे हा मंगळवार कोरडवार ठरणार आहे. या पाणीपुरवठा बंदमुळे कल्याण पूर्व आणि पश्चिम तसेच कल्याण शहराल गतच्या ग्रामीण भागातील वडवली, शहाड, टिटवाळा, मांडा परिसराला मंगळवारी कल्याण-डोंबिवली पालिकेकडून पाणीपुरवठा होणार नाही.

बारावे आणि मोहिली येथील उदंचन आणि जलशुद्धीकरण केंद्रात उल्हास नदीतून पाणी उचलले जाते. हे पाणी उचलताना नदी पात्रातून वाहून येणारा पालापाचोळा, डोंगर-दऱ्यातून वाहून येणारी माती नदी पात्रातून पालिकेच्या पाणी उचलण्याच्या मोहिली, बारावे येथील यंत्रणेत अडकते. ही यंत्रणा वेळच्या वेळी साफ केली नाही तर उदंचन केंद्राजवळील यंत्रणा नादुरुस्त होऊन पाणीपुरवठा उचलण्यात अडथळे येतात. गेल्या पाच महिन्यांच्या काळात यंत्रणेत अडकलेला गाळ, माती काढण्यासाठी पालिकेने आठ ते दहा वेळा पाणीपुरवठा बंद ठेवून ही कामे पूर्ण केली आहेत. आता पावसाचे प्रमाण कमी झाल्याने गेल्या महिनाभराच्या कालावधीत वाहून आलेला गाळ, माती, पालापाचोळा पाणी उचलण्याच्या मार्गिकेतून काढण्याची गरज आहे. त्यामुळे पालिकेने हे काम मंगळवारी करण्याचे नियोजन केले आहे.

याठिकाणी पाणी नाही
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी, चिंचपाडा, कैलासनगर, वालधुनी, विजयनगर, नेतिवली, चक्कीनाका, पत्रीपूल, लोकग्राम, कल्याण पश्चिमेतील मुरबाड रस्ता, बेतुरकरपाडा, बिर्ला महाविद्यालय परिसर, खडकपाडा, पारनाका, दूधनाका, गोविंदवाडी, आधारवाडी, गंधारे, बारावे, शहाड, आंबिवली, मोहने, धाकटे शहाड, बंदरपाडा, अटाळी परिसराचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे.